अपघातांचा शापित नवले पूल
>> नवनाथ शिंदे
नवले पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दरदिवशी जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. अपघातानंतर एनएचआय, महापालिका, पोलीस, आरटीओ, वाहतूक विभागाला जाग येते. त्यानंतर दोन-चार दिवस तकलादू उपाययोजना राबवून वेळ निभावून नेली जाते. मात्र, पूल परिसरात दूरगामी उपाययोजनांची होणारी टाळाटाळ वाहनचालकांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पुलावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य नियोजनाला गती देत अपघात कमी होण्याच्या उपाययोजना राबवणे महत्त्वाचे आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गाची वाट नवले पुलावरून जात असल्यामुळे दरदिवशी हजारो अवजड वाहने शहराजवळून मार्गस्थ होतात. विशेषतः मुंबईहून सातारा आणि कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातून मुंबईच्या दिशेने वाहनांची वर्दळ कायमस्वरूपी वाढत आहे. त्यातच उतारावर वाहनचालकांचे सुटणारे नियंत्रण, ब्रेक फेल होण्याच्या घटनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे सलग १० ते १२ वाहनांना धडक देण्यापासून ते मोटारीला आग लागून तडफडत मरणाऱ्या नागरिकांचे जीव स्वस्त झाले आहेत, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.
नवले पुलानजीक होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासन, शासन अन् नागरिक हतबल झाले आहेत. तीव्र उतार, वाहतूक नियम आणि आरटीओ नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य अजवड वाहनांद्वारे होणारी वाहतूक, बेशिस्त वाहनचालक अपघातास कारणीभूत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मात्र, त्याबाबतीत काही दिवस चर्चा होऊन पुन्हा जैसे थे परिस्थिती तयार होते. अपघातानंतर मंत्र्यांपासून संबंधित सर्व प्रशासनाची घटनास्थळी दिली जाणारी भेट काही दिवसांत गायब होत आहे. त्यानंतर वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि नियमांचे उल्लंघन सातत्याने घडत आहे. त्यामुळेच अपघाताला निमंत्रणच दिले जात आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस नवले पूलावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे दुचाकीस्वार, मोटार चालक, पीएमपीएल चालकांच्या मनातील भीतीचे काहूर वाढीस लागले आहे. अपघातांमुळे शापित नवले पूल की, भुताटकी अशीही चर्चा जोर धरत आहे.
अपघातांच्या अभ्यासाचे काय झाले?
नवले पूल परिसरात २० नोव्हेंबर २०२२ रोजी मोठा अपघात झाला होता. त्या रात्री प्रवासादरम्यान पाठोपाठ तीन अपघात झाले होते. कर्नाटकातून तांदूळ घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने तब्बल ४८ वाहनांना उडवले होते. त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्लीतील पथकाने धाव घेतली होती. पथकाने उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डिझेल वाचवण्यासाठी वाहने केली जाताहेत न्यूट्रल
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिजदरम्यान आठ किलोमीटरचा उतार आहे. उतारावर ट्रकचालक सर्रास वाहन बंद करून न्यूट्रल वाहने चालवतात. महामार्गाच्या आजूबाजूला स्थानिकांना बाहेर निघण्यासाठी रस्ते ठेवले आहेत. त्यामुळे अचानक वाहन महार्गावर आल्यास नियंत्रण सुटून अपघात होतात. दुसरीकडे वाहन न्यूट्रलवर असल्यास त्याचा ब्रेक लागत नसल्यामुळे अपघात घडत आहेत.
२२ सूचनांचे पालन करणार कोण?
दरी पूल आणि नवले पुलावर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने २२ उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये टोल नाक्यावर जड वाहनांसाठी चेक पोस्ट उभारले होते. अतिरिक्त स्पीड गन आणि सूचना फलकही लावले होते. स्पीड गन, रम्बलर, पिवळे पट्टे लावले गेले होते. तरीही पुन्हा मोठे अपघात घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List