पेणच्या कांदळेपाडा गावात सांडपाण्याच्या लाटा, गटार बुजवल्याने गाव वेठीला
गटारात दगड, माती, विटांचा भराव टाकून पाण्याचा प्रवाह अडवल्याने कांदळेपाडा गावात सांडपाण्याच्या लाटा उसळत आहेत. यावर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. गटार बुजवल्यामुळे संपूर्ण गाव वेठीस धरले गेले आहे. घरासमोर सांडपाण्याचे डबके तयार झाल्याने डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पेण तालुक्यातील कांदेपाडा गावात गेल्या ५० वर्षांपूर्वी सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता गटार बांधण्यात आले होते. मात्र गावातील ग्रामस्थ सुनील लांगी व त्यांच्या कुटुंबीयांनी माती, विटा व दगड टाकून गटार बुजवल्याचा आरोप माजी सरपंच मुरलीधर भोईर यांनी केला आहे. गटार बुजवल्याने सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणाच कोल मडून पडली आहे. गटारातील पाणी पुढे जात नसल्याने गटार ओव्हरफ्लो झाले आहे. सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने गावकऱ्यांना यातूनच वाट काढावी लागत आहे. सांडपाण्यामुळे डास, जंतू, कीडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आजारी व्यक्तीला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
.. तर आंदोलन छेडणार
ग्रामपंचायतने तीन ते चार वेळा या गटारातील भराव काढून मार्ग मोकळा केला होता, परंतु वारंवार भराव टाकून गटार बंद केल्याने या भागाला डबक्याचे स्वरूप आले आहे. याविरोधात ग्रामपंचायतीने पेणचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, वडखळ पोलीस ठाणे, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या समस्येची दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच मुरलीधर भोईर यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List