परीक्षण – संघर्षमय जीवनाची प्रेरक आत्मकथा
>> श्रीकांत आंब्रे
‘सिल्व्हर नीड्ल’ ही विविध व्यवसायांत यशस्वी मुशाफिरी करणाऱया डोंबिवलीतील एका व्यावसायिकाची थक्क करणारी प्रेरक आत्मकथा. संजय हिरासकर हे त्यांचे नाव. पश्चिम डोंबिवलीतील एका बकाल चाळीत वडिलांच्या टेलरिंगच्या पिढीजात व्यवसायाला वयाच्या अकाराव्या वर्षापासून जुंपून घेणाऱया आणि घरच्यांचे कसलेही सहाय्य नसताना भिन्नभिन्न स्वरूपाच्या अनेक व्यावसायिक क्षेत्रांतील कर्तृत्वाची शिखरं केवळ जिद्द व चिकाटीच्या बळावर सर करणाऱया बुद्धिमान माणसाची ही कहाणी. ज्येष्ठ साहित्यिक आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनाचा आव्हानात्मक प्रवास प्रभावीपणे साकार करणाऱया वडावाला यांनी आजपर्यंत आपल्या शैलीदार लिखाणाने आत्मकथा लिहून अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला आहे. त्यातीलच ही एक आत्मकथा.
‘सिल्व्हर नीड्ल’ या हिरासकरांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनातील संघर्ष, नाटय़, बेधडकपणा, सचोटी आणि नेहमीच ‘क्वालिटी’ला महत्त्व देणारी हिरासकरांची वृत्ती वडावाला यांना भावली व त्यातून या आत्मकथेचा उगम झाला. त्यातून नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल, काही उद्बोधक शिकता येईल हा हेतू त्यामागे होता. आयुष्यातील संकटं, ताणतणाव, आनंद क्षण या आत्मकथेत ताकदीने साकार झाले आहेत. यातील प्रत्येक प्रकरण, प्रत्येक प्रसंग वाचताना, त्यातील ‘थ्रिल’ अनुभवताना एखादी उत्कंठामय कादंबरीच वाचत असल्याचा अनुभव वाचकांना नक्की येईल. कारण हिरासकरांचं बालपणापासूनचं आयुष्य म्हणजे एक अजब रसायन होतं. घरात बालपणापासून मिळणारी सापत्न वागणूक, शिंपीकाम हेच आयुष्याचं ध्येय असल्याची वडिलांनी करून दिलेली समजूत, त्यातून बालमनाचा होणारा कोंडमारा, कोंडी फोडून बाहेर निघण्याची जिद्द, यातून आयुष्याला स्वतःच लावलेली वेगवेगळी वळणं हिरासकरांना कुठून कुठे घेऊन जातात याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
वडिलांच्या शिंपीकामाच्या व्यवसायाला कालेजच्या वयात तो बरकत आणतोच, पण पुढे स्वतःचा दुग्ध व्यवसाय, इंपोर्टेड कापडविक्री, एअर इंडिया कर्मचाऱयांचे युनिफार्म शिवून देण्याचं कंत्राट, जमीन विक्री, उंची विदेशी मद्याची वाहतूक, सेकंड होम कन्स्ट्रक्शन अशा नाना व्यवसायांचे यशस्वी अनुभव घेताना तो कधी कर्जबाजारी होतो, तर कधी जमीन खरेदी-विक्री व्यवहारात पैसे खाण्यासाठी प्रत्येक वेळी अडवणूक करणाऱया सरकारी अधिकाऱयांच्या भ्रष्टाचारी वृत्तीने वैतागून जातो. तरीही जिद्द न सोडता त्यांच्या खनपटीला बसून काम मार्गी लावतोच. काही मित्र देवासारखे मदतीला धावून येतात. काही योगायोग घडतात, दैव पालटतं, व्यवसायात धो-धो पैसा मिळू लागतो. त्यातून दापोलीला सर्व सोयींनी युक्त आलिशान हाटेल बांधतो. बांधकाम आणि इतर क्षेत्रांची इत्थंभूत माहिती असल्यामुळे हाटेलातील अत्याधुनिक फर्निचर स्वतः चीनला जाऊन आणतो, यावरून हिरासकरांच्या कल्पकतेची नव्हे तर प्रत्यक्षातील झेप किती उंचीची असू शकते हे या आत्मकथेतील अनेक प्रसंगांतून लक्षात येतं. मुळात त्यांना सर्व प्रकारच्या वाचनाची आवड आहे. वाईल्ड फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद आहे. जीव धोक्यात घालून त्यांनी त्यासाठी अनेक मोहिमा पार पाडल्या आहेत. प्रसंगोपात अनेक देशांचे अनेक वेळा दौरे केले आहेत आणि हे सर्व वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत. आज आपल्या कुटुंबासह ते सुखवस्तू जीवन जगत आहेत त्यामागे त्यांनी भोगलेले कष्ट, यातना आणि संघर्ष आहे. अपयशाने खचून न जाता राखेतूनही फिनिक्स पक्ष्यासारखी उभारी घेता येते हाच बोध हिरासकरांच्या आत्मकथेतून कुणालाही घेता येईल.
या आत्मकथेतील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्तिरेखा ठसठशीतपणे उभी करण्याचं कसब मात्र सुमेध वडावाला यांचं आहे. संवादातून त्यातील नाटय़ उभं करण्यासाठी मुळात त्यातील नायकाकडून ते प्रसंग ऐकून ते एखाद्या दृश्यासारखे लेखनातून मांडणं यासाठी आपलं प्रतिभासामर्थ्य पणाला लावावं लागतं. ही किमया वडावाला यांनी केली आहे. शाळकरी वयात अभ्यासात यथातथाच असणाऱया संजय हिरासकरांच्या कुशाग्र बुद्धीची चमक त्यांच्या शाळकरी वयापासून जशी दिसते, तशीच या बुद्धिमान हिरासकरांना आत्मकथेच्या सुरेख कोंदणात बसवून त्यांचं कर्तृत्व जगासमोर मांडण्याची धमक वडावाला यांच्या या लेखनात प्रकर्षाने जाणवते. पुस्तकातील रंगीत छायाचित्रं तसंच चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ साजेसं आहे.
सिल्व्हर नीड्ल
(संजय हिरासकर यांचं आत्मकथन)
लेखक ः सुमेध वडावाला (रिसबूड)
प्रकाशक ः मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 232, ह मूल्य ः रु. 320/-
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List