ताथवडेतील जमिनीची परस्पर विक्री, दुय्यम निबंधकासह 26 जणांवर गुन्हा
ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या 15 एकर 32 गुंठे शासकीय जमिनीची खरेदी-विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची ही जागा असून या जमिनीचे जुने सातबारा उतारे जोडून त्याची दस्तनोंदणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाने पोलिसात धाव घेत दस्त नोंदणी करणाऱया दुय्यम निबंधकासह जागेची खरेदी विक्री करणाऱयांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार 26 जणांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे 6 हेक्टर 32 गुंठे जमीन विक्रीचा प्रकार पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीत समोर आला. ही जमीन पूर्वी हेरंब पंढरीनाथ गुपचूप यांच्या मालकीची असल्याचे विक्री करणाऱयांनी दर्शवले आहे. दरम्यान या जमिनीच्या सातबारा उताऱयावर आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा, शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी, विक्रीस बंदी’असा शेरा आहे. त्यानंतरही या जमिनीचे जुने सातबारा उतारे जोडून याची 33 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली. ही जमीन कफिल छोटम फकीर, सय्यद फैय्याज मीर अजिमोद्दीन यांनी खरेदी केली आहे. ही खरेदी 9 जानेवारी 2025 रोजी दापोडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. याची दस्त नोंदणी सह दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे-सांगळे यांनी करून दिली.
ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या 6.32 हेक्टर जागेची खरेदी-विक्री झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला नव्हती. विभागाच्या तपासणीमध्ये हा प्रकार समोर आला. नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे हा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. – अमोल आहेर, व्यवस्थापक, शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List