जालन्यात बिबट्याची दहशत; गोठ्यात घुसून बिबट्याचा गायीवर हल्ला, गायीचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रुई परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण आहे. भागवत श्रीराम ढवळे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने घुसून बांधलेल्या गाईचा फडशा पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. सकाळी गोठ्यामध्ये गाईचा मृतदेह आढळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रुई गावालगत असलेल्या ढवळे यांच्या शेतात गोठा व आखाडा असून शुक्रवारी रात्री गाईला गोठ्यात बांधून ते घरी परतले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्या थेट गोठ्यात घुसला. गोठ्यामधील गाईवर त्याने हल्ला केला आणि काही क्षणातच तिचा फडशा पाडला. गाईच्या पाठीमागील भागाचे लचके तोडलेले दिसून आले. या हल्ल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला. हल्ला इतक्या शांतपणे करण्यात आला की शेजारील शेतातील लोकांना कोणताही आवाजही ऐकू आला नाही.
पहाटे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेलेल्या ढवळे यांना गाईचा मृतदेह दिसताच त्यांना धक्का बसला. गाईचा पूर्ण पाठीमागील भाग ओरबाडलेला, आजूबाजूला रक्ताचे डबके आणि बिबट्याचे पाऊलखूण दिसत होत्या. त्यांनी तातडीने गावकर्यांना व वनविभागाला कळविले. काही वेळातच व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनअधिकार्यांनी पंचनामा करून मृत गायीचे शवविच्छेदन केले. गाईचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचे प्राथमिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशीत बिबट्या कोणत्या दिशेने आला व कुठे गेला याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरात पिंजरे लावण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. वनअधिकार्यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकटे शेतात किंवा पायवाटांवर न जाण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, आता बिबट्याने थेट गोठ्यात शिरत गायीवर हल्ला केल्याने भीती वाढली आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी सकाळी कुणीही जायला तयार नव्हता. विशेषतः महिला, वृद्ध आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List