गणपतीपुळे समुद्रात बुडून भिवंडीतील तरुणाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या एका गटातील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तिसरा तरूण अमोल गोविंद ठाकरे (वय २५) या तरुणाचा मात्र बुडून मृत्यू झाला आहे. भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे आले होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंदिरानजीकच्या समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले.
किनाऱ्यावर असलेल्या लोकांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, तेथील जीवरक्षक त्वरित मदतीला धावले. त्यांनी जेटस्की बोटीच्या साहाय्याने बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात अमोल गोविंद ठाकरे या तरुणाचा जीव वाचवण्यात अपयश आले आणि त्याचा मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या अन्य दोन तरुणांची नावे मंदार दीपक पाटील आणि विकास विजयपाल शर्मा अशी नावे आहेत. मंदिर प्रशासन आणि किनाऱ्यावरील जीवरक्षकांकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटक समुद्रस्नान करताना पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List