हिंदुस्थानच्या आयटी प्रोफेशनल्सना मोठा धक्का; अमेरिका ‘एच- 1 बी’ व्हिसा बंद करण्याचे विधेयक आणण्याच्या तयारीत
अमेरिकेत जाऊन तिथल्या आयटी कंपन्यांत नोकरी करणाऱ्या हिंदुस्थानच्या आयटी प्रोफेशनल्सना मोठा धक्का देण्याच्या तयारीत ट्रम्प सरकार आहे. अमेरिकेतील एका खासदाराने घोषणा केलीय की, ते असे एक विधेयक आणतील, ज्याद्वारे एच- 1 बी व्हिसा योजना पूर्ण समाप्त केली जाईल आणि त्यासोबत अमेरिकेतील नागरिकत्वाचा रस्ताही बंद केला जाईल. व्हिसा संपल्यानंतर लोकांना आपल्या देशात परत जावे लागेल, असेही त्यांनी म्हटलेय.
अमेरिकेतील जॉर्जियाच्या खासदार मार्जोरी टेलर ग्रीन यांनी हे वक्तव्य केलेय. एक्सवरील व्हिडीओत ग्रीन यांनी म्हटलंय, आम्ही एच- 1 बी व्हिसा कार्यक्रम संपवण्यासाठी विधेयक आणत आहोत. एच- 1 बी व्हिसा कार्यक्रमाचा वापर अनेक वर्षे फसवणूक, दुरुपयोग आणि अमेरिकन कर्मचाऱयांना हटवण्यासाठी केला जातोय.
खासदार ग्रीन यांच्या मते, विधेयकात एक सवलत असेल ती म्हणजे प्रत्येक वर्षी दहा हजार मेडिकल प्रोफेशनल (डॉक्टर, नर्स) यांना व्हिसा देण्यात येईल. मात्र ही संख्या पुढील दहा वर्षांत समाप्त केली जाईल, तोपर्यंत अमेरिका डॉक्टरांची फळी उभारेल. मार्जोरी टेलर ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार, एच-1 बी व्हिसाधारकांसाठी अमेरिकेच्या नागरिकत्वाचा रस्ता बंद केला जाईल आणि व्हिसाची मुदत संपल्यावर त्यांना मायदेशी परतावे लागेल. जे अस्थायी व्हिसावर आहेत, त्यांना त्यांच्या देशात परत जावे लागेल. आम्ही त्यांचा कामाचा आदर करतो, पण अमेरिका फर्स्ट, असे ग्रीन म्हणाले. ग्रीनचा दावा आहे की, गेल्या वर्षी 9 हजार अमेरिकन डॉक्टर मेडिकल कॉलेजमधून पास होऊनही ते निवासी डॉक्टर होऊ शकले नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List