नगरमध्ये जप्त केलेल्या 72 लाखांचा हिशेब लागेना; प्राप्तीकरच्या अहवालानंतरच होणार उलगडा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात जप्त करण्यात आलेल्या 72 लाखांच्या रोख रकमेबाबत जिल्हा प्रशासनाला आठवडाभरानंतरही हिशेब जुळलेला नाही. या संदर्भातील समितीला प्राप्तीकर विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच पकडलेली रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. बेहिशेबी होती की हवालाच्या माध्यमातून व्यवहार सुरू होता, याचा उलगडा होणार आहे.
पोलिसांनी 72 लाखांची रोकड पकडली असली, तरी नगर शहरातून कोटय़वधी रुपयांच्या हवाला व्यवहारात कोणताही खंड पडलेला नाही. हे व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक यंत्रणा किंवा पोलिसांच्या कारवाईचा हवाला व्यवहारावर कोणताही परिणाम झालेला नाही.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 21 मार्चला सायंकाळी शहरातील ख्रिस्त गल्ली व बाजार समितीमधील एका गाळ्यातून 72 लाखांची रोकड जप्त केली. ही रक्कम निवडणुकीशी संबंधित आहे का, याची चौकशी सध्या निवडणूक यंत्रणेमार्फत केली जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी अशा तिघांची समिती आहे.
या समितीने प्राप्तीकर विभागाकडून 7 दिवसांत अहवाल मागवला आहे. तो अद्यापि समितीला प्राप्त झालेला नाही. रक्कम जरी दोघा ‘अंगडियां’कडून जप्त केली असली, तरी प्रत्यक्षात 5 जणांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राप्तीकर विभागाने या संदर्भात पाचजणांना नोटिसा बजावल्याचे समजते. त्याचा अहवाल अद्यापि प्रतीक्षेत आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पकडलेली रोकड निवडणुकीसंदर्भात होती की बेहिशेबी होती हे समजणार आहे. ही रक्कम निवडणुकीशी संबंधित नसेल तर हिशेब सादर केल्यानंतर समिती रक्कम संबंधितांना परत करू शकते. ही रक्कम बेहिशेबी असेल तर प्राप्तीकर विभागामार्फत चौकशी केली जाईल.
पोलिसांनी पकडलेली 72 लाखांची रोकड हवाला व्यवस्थेसंदर्भात असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ऑनलाइन व्यवहाराच्या जमान्यातही हवाला व्यवहाराचे महत्त्व, बेकायदा असले तरी टिकून आहे. शहरात हवाला व्यवहार करणारे दहा-बारा ‘अंगडिया’ आहेत. पोलिसांनी शहरातील ज्या ख्रिस्त गल्ली व बाजार समिती भागात ही रक्कम पकडली, त्या अंगडियांची कार्यालये त्याच भागात आहेत. गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूक काळातही बाजार समिती शेजारील सहकार सभागृहाच्या रस्त्यावर हवाला व्यवहारातील रक्कम पकडली गेली होती. याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी परप्रांतीय युवकांच्या टोळीने पाळत ठेवून हवाला व्यवहारातील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List