उमेदवारी मिळाल्याचे समजून स्वागत… पण उदयनराजे वेटिंगवरच!
उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी कन्फर्म धरून त्यांच्या समर्थकांनी बुधवारी जिह्याच्या सीमेपासून साताऱ्यापर्यंत त्यांचे जंगी स्वागत केले. त्याला चार दिवस झाले तरी भाजपकडून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली नसल्यामुळे मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपने उदयनराजेंना अद्यापि ‘वेटिंगवर’च ठेवल्यामुळे ‘चर्चा तर होणारच’ अशी परिस्थिती आहे.
उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे सदस्य असले, तरी लोकांमधून निवडून येण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीतच त्यांचे नाव यायला हवे होते, अशी शिवप्रेमींची धारणा होती; परंतु भाजपची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी यादी आली, तरी त्यात उदयनराजे यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
एका बाजूला आपण उदयनराजे यांना सन्मान देत असल्याचे दाखविताना भाजपकडून प्रत्यक्षात विपरित कृती होत असल्याचे दिसते. उमेदवारीचा निर्णय होत नसल्यामुळे याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मध्यंतरी उदयनराजे यांनी थेट दिल्ली गाठली; पण अमित शहा यांनीही त्यांना ‘वेटिंगवर’ ठेवले. अखेर त्यांची भेट झाली. त्यानंतर उमेदवारी कन्फर्म झाल्याचे गृहीत धरून उदयनराजे सातारला यायला निघाले. दिल्लीची मोहीम फत्ते करून उदयनराजे येत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिह्याच्या सीमेपासून म्हणजे नीरा नदीपासून साता ऱ्यापर्यंत त्यांचे अवाढव्य वाटावे असे जंगी स्वागत केले. पण पक्षीय पातळीवर अळीमिळी गुपचिळी असे वातावरण असून, शनिवार उजाडला तरी भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे कुजबूज सुरू झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List