महापालिका निवडणुकीसाठी 15 हजार कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची कसरत
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने निवडणूक विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुमारे 15 हजार अधिकारी, कर्मचारी लागणार आहेत. यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी तसेच, अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला कसरत करावी लागत आहे.
सुमारे नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौज आवश्यक आहे. निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना तयार झाली आहे. विधानसभा मतदारसंघानुसार मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दि. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत होणार आहे.
सद्यः स्थितीत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 301 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आणखी 15 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सुमारे 2 हजार 100 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्र प्रमुख व सहायक केंद्र प्रमुख असे चार कर्मचारी असतील. एका केंद्रावर पाच कर्मचारी असे एकूण 12 हजार 600 कर्मचारी नेमावे लागणार आहेत. त्याशिवाय 20 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार, सुमारे 15 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज निवडणुकीसाठी लागणार आहे.
- निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 11 उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. एका अधिकाऱ्याकडे 3 प्रभाग असतील. त्या एका कार्यालयात 25 ते 30 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची नेमणुक केली जाणार आहे.
गरजेनुसार कर्मचाऱ्यांची नियक्ती
निवडणूक अधिकारी यांचे विशेष अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयासाठी तसेच सर्व प्रकारच्या कर्तव्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीसंदर्भात व्यवस्थापन, आचारसंहिता व्यवस्थापन, निवडणूक प्रशिक्षण, मतदान केंद्र तसेच स्थापत्य व विद्युत व्यवस्था, ईव्हीएम वितरण, वाहन अधिग्रहण, मतमोजणी आराखडा स्ट्राँग रूम व्यवस्थापन, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, स्विप व्यवस्थापन, निवडणूक खर्च व्यवस्थापन, संगणकीय कामकाज कक्ष, बैठक नियोजन इतिवृत्त कक्ष, दूरसंचार सुविधा कक्ष यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरजेनुसार ते त्या विभागात काम करीत आहेत. अत्यावश्यकतेनुसार काही विभागातील कर्मचारी संख्या कमी किंवा जास्त केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विविध सेलनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 301 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे 15 हजार कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक असतील. त्यानुसार नियोजन सुरू आहे.
मनोज लोणकर, सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List