दिव्यात भटक्या कुत्र्याने चिमुकलीचे लचके तोडले, दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना दिव्यातील विकास म्हात्रे गेट परिसरात घडली आहे. वेदा काजारे असे या चिमुकलीचे नाव आहे. ती भावासोबत रस्त्याने चालत असताना मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने तिचे लचके तोडले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पालिकेच्या निर्बीजीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वेदा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भावासोबत खेळण्यासाठी इमारतीच्या खाली उतरली होती. त्याच वेळी मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने तिच्या पाठीचा जोरदार चावा घेतला. ती खाली कोसळली आणि त्या कुत्र्याने तिचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात वेदाच्या पाठीला, छातीला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याने केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दिव्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका त्याकडे कानाडोळा करत आहे. महापालिकेने यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडू. – अॅड. रोहिदास मुंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख, कल्याण ग्रामीण
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List