पुण्यात ‘दृश्यम’! पत्नीचा खून; मृतदेह भट्टीत जाळून पोलिसांत ‘मिसिंग’
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून पुरावे नष्ट केले. वारजे माळवाडी पोलिसांच्या तपासाने हा थरकाप उडवणारा खून उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
समीर पंजाबराव जाधव (४२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, अंजली समीर जाधव (३८, रा. शिवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अंजली शिक्षिका म्हणून एका खासगी शाळेत नोकरी करत होती.
समीरला पत्नीचे एका व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने खून करण्याचा कट रचला. त्याने दहा दिवसांपूर्वीच लोखंडी भट्टी तयार केली होती. २६ ऑक्टोबर रोजी तो पत्नीला फिरायला घेऊन गेला आणि खेड-शिवापूर परिसरातील गोडाऊनमध्ये नेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर लाकडे, पेट्रोल आणि लोखंडी भट्टी वापरून मृतदेह जाळून टाकला. पुढच्या दिवशी त्याने भट्टी स्क्रॅप करून पुरावा नष्ट केला. त्यानंतर समीरनेच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वारजे पोलिसांत केली होती. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे आणि त्यांच्या पथकाला त्याच्या वागण्यात विसंगती जाणवली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या सूचनेनुसार वारजे पोलिसांनी तांत्रिक तपासावरून खून झाल्याचे निष्पन्न केले. चौकशीत समीरने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे निरीक्षक प्रकाश धेंडे, नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड यांनी ही कारवाई केली.
चित्रपट पाहून आखला खुनाचा कट
समीरने पत्नीचा खून करण्यापूर्वी ‘दृश्यम’ चित्रपट चारवेळा पाहिला होता. पोलिसांपासून कसा बचाव करता येईल, पुरावे कसे नष्ट करता येतील, याचे त्याने बारकाईने निरीक्षण केले. मात्र, वारजे पोलिसांच्या दक्ष तपासामुळे त्याच्या ‘परफेक्ट क्राइम’ योजनेचा भंडाफोड झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List