न्यू हॉलीवूड – मार्क नॉर्मंड – अनपेक्षित वळणांचा वेग
>> अक्षय शेलार
समकालीन कॉमेडीच्या नकाशावर मार्क नॉर्मंडची अनपेक्षित वळणांची शैली सहजरीत्या निर्माण केलेली आणि वरवरची वाटत असली तरी त्यात एक काळजीपूर्वक रचलेली कलाकृती दडून बसलेली आहे,
मार्क नॉर्मंड हा गेल्या दशकात झपाट्याने प्रसिद्धीला आलेल्या अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियन्सपैकी एक आहे. न्यू ऑर्लिन्समध्ये वाढलेला आणि तिथली जॅझ संस्कृती, बार नि क्लबमधील वातावरण यांचा प्रभाव असलेला नॉर्मंड विलक्षण वेगवान मांडणी, लहेजा, शब्दांचा खुसखुशीत वापर आणि रोजच्या आयुष्यातील किरकोळ प्रसंगांवरील विनोदी निरीक्षणं यासाठी ओळखला जातो. त्याची शैली सेट-अप आणि त्यापाठोपाठ येणारी पंचलाइन या पारंपरिक पद्धतीवर आधारित असली तरी त्याच्या पंचलाइन्समध्ये नेहमीच अनपेक्षित वळणं असतात.
नातेसंबंध, डेटिंग कल्चर, सामाजिक दांभिकता, पॉलिटिकली करेक्ट वक्तव्यं आणि लिंगभेद यांसारख्या विषयांवर नॉर्मंड उपरोधिक पद्धतीने बोलतो. त्याचे विनोद कधीही फार भडक नसतात, पण ते सामाजिक-सांस्कृतिक दांभिकतेचा नेमका वेध घेतात. त्याच्या विनोदामध्ये एक प्रकारचा विचित्र प्रामाणिकपणा आहे. तो स्वतच्या वैयक्तिक असुरक्षिततेबद्दल, सामाजिक भीतींबद्दल किंवा स्वतच्या चुकांबद्दलही हसत-खेळत बोलतो आणि कदाचित त्यामुळेच प्रेक्षकांनाही त्यात आपलीच झलक दिसते.
‘आऊट टू लंच’ (2020) या यूटय़ूबवर मोफत उपलब्ध करून दिलेल्या स्टँड-अप स्पेशलने त्याला मोठय़ा प्रमाणावर लोकप्रियता मिळवून दिली. या स्पेशलमध्ये त्याने न्यूयॉर्कच्या शहरी जीवनशैलीपासून ते इंटरनेटच्या विचित्रतेपर्यंत अनेक गोष्टींवर जोक्स रचले. त्याचं खास वैशिष्टय़ म्हणजे एका मिनिटात दहा-बारा पंचलाइन्स अशी त्याची गती. मार्क नॉर्मंड हा समकालीन अमेरिकन स्टँड-अपच्या जलदगती आणि चपळ लहेजाचा प्रतिनिधी आहे. त्याची कॉमेडी तातडीची, तीव्र आणि अतिशय अर्थपूर्ण असते. अनेकांना ती पहिल्या ऐकण्यावर साधी, अगदी वरवरची वाटू शकते, पण खरे तर त्याच्या शब्दरचनेतील कसब आणि पंचलाइन्सच्या सूक्ष्म मांडणीमागे एक काटेकोर शिल्पकार दडून बसलेला असतो. तो शब्द घनघोर वेगाने फेकत राहतो आणि तत्काळ, कमीत-कमी विरामानंतर थेट, तीक्ष्ण पंचलाइन देतो. विरामाचा जवळ जवळ अभाव हेच त्याचं शस्त्र आहे. त्याच्या आवाजातला किंचित चिंताग्रस्त, किंचित मखमली सूर प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारची जवळीक निर्माण होत असल्याचा भास निर्माण करतो. ‘लहान चणीचा माणूस’ ही स्टेज पर्सोना त्याला इतर कॉमेडियन्सपासून वेगळे ठरवते. त्याची स्वतच्याच विनोदांवर हसत-हसत थांबण्याची कला, तिथून लगेच दुसऱ्या विनोदाकडे घेतलेली धाव आणि शेवटी पुन्हा एक पंच देणे हे त्याच्या परफॉर्मन्सचे मूलभूत तंत्र आहे.
त्याच्या स्टँड-अपमध्ये क्लासिक अमेरिकन निरीक्षणपर विनोदाची परंपरा जाणवते. जेरी साईनफेल्डसारख्या कॉमेडियनकडून आलेली ही शैली. मात्र त्यात नॉर्मंडचा थोडा अधिक उग्र, आधुनिक आणि स्वतवर विनोद करणारा दृष्टिकोनही आहे. क्लासिक निरीक्षणप्रधान विनोद त्याच्या कामाच्या मुळाशी असतात, पण त्यात नेहमीच एक आधुनिक सूर मिसळलेला आढळतो. मार्कचे सेट्स बहुतेकदा अनेक लहान-लहान पंचेसने भरलेले असतात. तो एकोळी विनोद आणि लहान तुकडय़ांमध्ये निपुण आहे, परंतु ही शैली, त्यातले सततचे ‘मिसडायरेक्शन’ प्रेक्षकांना चकवते. त्याचे अनेक विनोद भाषेच्या आधारे रचलेले असतात. शब्दांची ड्युअॅलिटी, अस्पष्ट संदर्भ आणि अचानक बदललेले संदर्भ यांच्या साहाय्याने तो हसवतो.
त्याच्या विषयांमध्ये डेटिंग, चिंता आणि अस्वस्थता, सामाजिक-राजकीय परिस्थिती, शहरी जीवनशैली आणि इंटरनेट विश्वातील विचित्रता यांचा समावेश आहे. कधी तो आधुनिक डेटिंग कल्चरवर विनोद करतो, मार्कची निरीक्षणे साधी वाटत असली तरी त्यात सामाजिक आत्मनिरीक्षण आणि कटू सत्य दडलेले असते. नॉर्मंड एक क्लब कॉमिक आहे. त्याने बरीच वर्षे छोटय़ा क्लब्समध्ये स्टँड-अप करून कौशल्यावर पकड आणि परिपक्वता मिळवली. एक प्रकारची ‘जोक मशीन’ असल्यामुळे निर्माण होणाऱ्या पुनरावृत्तीचा आरोप नॉर्मंडवर नेहमी होतो. त्याच्या गतीमुळे काही वेळा पंचची खोली किंवा गहनता कमी वाटू लागते. दुसरीकडे आजकालचे प्रेक्षक अधिक कथाकेंद्रित आणि विस्तृत, विस्तारित सेटची अपेक्षा बाळगतात. त्यामुळे फारच लहान-लहान बिट्सची रचना समान परिणाम साधत नाही. मात्र त्याचे चाहते या टीकेकडे दुर्लक्ष करतात.
समकालीन कॉमेडीच्या नकाशावर मार्क नॉर्मंड हे तीव्र, सुस्पष्ट आणि आक्रमक शब्दशिल्पकाराचे प्रतीक आहे. तो छोटे, नेमके आणि अनेकदा विवादास्पद व तरीही विचारप्रवर्तक विनोद करतो. क्लबसंस्कृतीतून आलेला एक निपुण कलाकार आजच्या डिजिटल युगात कसा टिकून राहू शकतो, हे त्यातून स्पष्टपणे दिसते. त्याची शैली ही सहजरीत्या निर्माण केलेली आणि वरवरची वाटत असली तरी त्यात एक काळजीपूर्वक रचलेली कलाकृती दडून बसलेली आहे, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List