लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श अयोग्य, सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावला तीन महिन्यांचा कारावास
लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श करणे अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका आरोपीला दणका दिला. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
बोरिवली ते विलेपार्लेदरम्यान प्रवास करणाऱ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा अंधेरी येथील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय आरोपीने वर्षभर पाठलाग केला. लोकल ट्रेनमध्ये आरोपीने पीडितेशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोक्सो न्यायालयात हा खटला सुरू होता त्यावेळी न्यायालयाने आरोपी हा कुटुंबातील कमावणारा एकमेव सदस्य असल्याची बाब लक्षात घेत त्याला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीला जामीन मिळण्यापूर्वी त्याने तुरुंगात घालवलेला कालावधी हीच त्याची शिक्षा म्हणून गृहीत धरली. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, पीडितेने आरोपीच्या कृत्यांमुळे जो त्रास सहन केला आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे वाजवी आणि पुरेशी शिक्षा देणे आवश्यक आहे. गुह्याचे स्वरूप पाहता त्याला प्रोबेशनचा फायदा मिळू शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले तसेच आरोपीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रकमेपैकी 10 हजार भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List