ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी
निवडणूक आयोग व मोदी सरकारच्या संघटित मतचोरीचा आज पुन्हा पर्दाफाश झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिसऱयांदा या मुद्दय़ावर पत्रकार परिषद घेत मतचोरीच्या ‘एच फाईल्स’ म्हणजेच ‘हरयाणा फाईल्स’ देशासमोर आणल्या. हरयाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 25 लाख मतांची चोरी झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी ढीगभर पुराव्यांसह केला. ब्राझीलच्या मॉडेलने या निवडणुकीत 22 वेळा मतदान केल्याचे त्यांनी समोर आणले. ‘हरयाणाची निवडणूक ही निवडणूक नव्हती, तर ती सरळसरळ चोरी होती. लोकशाहीच्या विरोधात कटकारस्थान रचून एक अख्खे राज्यच चोरले गेले,’ असा आरोप राहुल यांनी यावेळी केला. ‘बीजेपी’ ही तर ब्राझिलियन जनता पार्टी आहे, अशा प्रतिक्रिया यानंतर सोशल मीडियात उमटल्या.
राहुल गांधी यांनी पूर्ण तयारीनिशी ही पत्रकार परिषद घेतली. त्यांनी फोटो, व्हिडीओसह हरयाणातील मतचोरीचे सादरीकरण केले. ‘हरयाणात एकूण दोन कोटी मतदार आहेत. त्यापैकी 25 लाख मतांची चोरी झाली आहे. प्रत्येक आठ मतदारांमागे एक मत चोरीला गेलंय. म्हणजेच तब्बल 12.5 टक्के मते चोरण्यात आली. इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या आधी हरयाणाच्या मतदार यादीतून साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यातील बहुतेक सर्व काँग्रेसचे मतदार होते, असे राहुल यांनी सांगितले.
काय म्हणाले होते नायाब सिंह सैनी?
मतचोरीमागे भाजप कसा आहे हे दाखवून देण्यासाठी राहुल यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओच दाखवला. ‘आम्ही एकतर्फी सरकार स्थापन करणार आहोत. तुम्ही चिंता करू नका. आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. सैनी यांना अपेक्षित असलेली ‘व्यवस्था’ म्हणजेच मतचोरी आहे, असे राहुल यांनी सांगितले.
भाजप नेत्याचे मुलासह यूपी, हरयाणात मतदान
भाजपचे नेते दालचंद आणि त्यांचा मुलगा यशवीर यांचे दोन मतदार कार्ड आढळून आले. या दोघांनी उत्तर प्रदेश आणि हरयाणा दोन्ही ठिकाणी मतदान केले. मथुरा जिह्यातील एका गावचे सरपंच प्रल्हाद यांनी हरयाणात मतदान केले. ही फक्त दोनच उदाहरणे नाहीत. अशा प्रकारे मतदान करणारे भाजपशी संबंधित हजारो लोक आहेत, असा दावा राहुल यांनी केला.
झेडपी उपाध्यक्षाच्या घरात 66 मतदार
पलवल जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाच्या घरात 66 मतदारांची नोंद आढळून आली. हे उपाध्यक्ष भाजपचे आहेत. याशिवाय काही घरात 500, काही घरांमध्ये 108 मतदारांचीही नोंद आढळली, मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता तिथे कुणीही आढळून आले नाही.
‘जेन झी’ला आवाहन
‘देशात जे काही गडबड-घोटाळे सुरू आहेत ते आम्ही लोकांसमोर ठेवतो आहे, जनतेसमोर आणतो आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री कायदेशीर नाहीत. हरयाणाचे, महाराष्ट्राचे सरकार कायदेशीर नाही. ते चोरीचे आहे, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. देशाची लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याची ताकद ‘जेन झी’ आणि तरुणांकडे आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लोकशाहीसाठी लढावेच लागेल, असे आवाहन राहुल यांनी केले.
अब की बार बिहार
‘लोकशाहीचा खून करण्याची ही पद्धतशीर यंत्रणा पंतप्रधान, गृहमंत्री आणि निवडणूक आयुक्तांनी विकसित केली आहे. प्रत्येक राज्यात हेच केले जाईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रात जे झाले, तेच बिहारमध्ये केले जाईल, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला. ‘मतचोरी एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही. राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे हे सुरू आहे. हा हिंदुस्थानच्या लोकशाही आत्म्यावरचा हल्ला आहे.महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या हिंदुस्थानवरचा आरएसएसचा हल्ला आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘मतदार याद्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी दिल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षांना आधी काहीच करता येत नाही,’ अशी खंतही राहुल यांनी व्यक्त केली.
अविश्वसनीय पण सत्य
- एका महिलेने हरयाणा निवडणुकीत तब्बल 22 वेळा मतदान केले. हे मतदान 10 वेगवेगळय़ा बूथवर केले. धक्कादायक म्हणजे ही महिला ब्राझीलची मॉडेल असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले.
- मतदार यादीत एकाच महिलेच्या पह्टोसह 100 वेगवेगळे मतदार नोंद केल्याचे आढळून आले. असे एकाच चेहऱयाचे 150, 200 मतदार आहेत. त्यांची नोंद वेगवेगळय़ा बूथवर आहे.
निवडणूक आयोग ते करू शकतो, पण…
दुबार मतदार वगळायचे ठरविल्यास निवडणूक आयोग ते सहज करू शकतो. तसे सॉफ्टवेअर त्यांच्याकडे आहे. एकसारखे फोटो असलेले, एकसारखे नाव आणि पत्ता असलेले मतदार वगळा एका क्लिकवर वगळले जाऊ शकतात. पण भाजपला मदत करायची असल्याने निवडणूक आयोग ते करत नाही. निवडणूक आयोगाकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास बोगस मतदानाची चोरी सहज पकडली जाऊ शकते, मात्र आयोग ते द्यायला तयार नाही. त्यांना निष्पक्ष निवडणूक नको आहे, असा आरोप राहुल यांनी केला.
ज्ञानेशकुमारांची लबाडी उघड
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची लबाडी राहुल गांधी यांनी उघड केली. ‘ज्यांना राहायला घर नसते त्या मतदारांची नोंदणी करताना घर क्रमांक शून्य लिहिला जातो, असे ज्ञानेशकुमार म्हणाले होते. त्यांच्या या माहितीची सत्यता तपासण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घर क्रमांक शून्य असलेल्या मतदारांची माहिती काढली. त्यावेळी घर क्रमांक शून्य असलेला नरेंद्र नावाचा मतदार प्रत्यक्षात आलिशान घरात राहत असल्याचे आढळून आले. अशी अनेक उदाहरणे असल्याचे राहुल म्हणाले. ज्ञानेशकुमार हे देशाच्या जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. बोगस मतदार सापडू नये यासाठीच शून्य क्रमांक दिला जातो, असा दावा राहुल यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List