‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास

‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास

मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण चित्रपटांपर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीचा झळाळता प्रवास नांदेडकरांनी ‘रुपेरी सोनसळा’ या मनोवेधक संगीत सोहळ्यात दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवला. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाळकृष्ण माडे, सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, जयमाला शिंदे, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुवर्णयुगाला उजाळा देणारा हा कार्यक्रम ‘पाडवा पहाट’च्या उत्सवी वातावरणात पार पडला.

जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ या उत्तरोत्तर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रातील पहिल्या कार्यक्रमाला नांदेड महानगरातील हजारो रसिक श्रोते उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला तरुणाईने. गर्दी केली होती.

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व त्यांच्या टीमने दिवाळी पहाट उपक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमातील सहभागी कलावंतांचा व साथीदारांचा सत्कार नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप,नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर ,निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व संयोजन समितीतील सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. १९६० ते १९८० या कालखंडातील मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजेच गीत, संगीत आणि आशय यांचे अभंग त्रिवेणी संगम — या काळातील मधुर गाण्यांची सरमिसळ कलांगण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘रुपेरी सोनसळा’ या नावाने रंगली. कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे होते.

सिंगापूरस्थित प्रख्यात गायिका सौ. पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे व विजय जोशी यांनी मराठी चित्रपटांच्या अमर गीतांना नवसंजीवनी दिली.

सच्चिदानंद डाखोरे व स्वरांजली पांचाळ यांनी गायलेल्या “तू सुखकर्ता, तू दुखहर्ता” या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तुझ्यासाठी शंकरा भिल्लीण मी जाहले, जय देवी मंगळागौरी, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे अंगाई गीत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, सख्या रे घायाळ मी हरिणी, इथूनी मी दृष्ट काढिते निमिष एक टाक तू , प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, हिलं हिलं पोरी हिला तुझ्या कपालीला टिळा, आज आनंदी आनंद झाला, चंद्र आहे साक्षीला, मी जलवंती…. मी फुलवंती, तुझी नजर लागेल मला , बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा, लबाड लांडग ढोंग करतय, आला आला वारा पावसाच्या धारा, अहो कुण्या गावाचं आलं पाखरू, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते, रेशमाच्या रेघांनी यासारखी श्रोत्यांच्या मनावर कायमची रुंजी घालणाऱ्या वैविध्यपूर्ण, अविस्मरणीय मराठी गाणी व लावण्या या गायकांनी अतिशय ताकदीने उत्तम पद्धतीने सादर केल्या.

या गाण्यांनी मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा गंध पुन्हा दरवळला — जेव्हा कथा भावस्पर्शी, गीतांमध्ये अर्थगर्भता आणि संगीतामध्ये आत्मा होता. या कालखंडानेच मराठी चित्रपटसृष्टीला कलात्मकता, सादरीकरण आणि संगीताच्या दर्जात नवे मापदंड दिले. तसेच हे चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक वास्तवाचे आरसे बनले. वसंत देसाई, सुधीर फडके, राम कदम, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि ग.दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर यांच्या गीतांनी चित्रपटांना आत्मिक उंची दिली. भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांपासून दादा कोंडकेच्या लोकाभिमुख विनोदी चित्रपटांपर्यंत विषयवैविध्य खुलले. संगीत, संस्कार आणि समाजभान यांच्या संगमाने या चित्रपटांनी मराठी मन जिंकले. निर्माते पत्रकार आणि गायक विजय जोशी यांच्या दाम करी काम या गीताने तर बहारच केली

कार्यक्रमाच्या अखेरीस “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तिगीताने मैफिलीची सांगता झाली. संगीत नियोजन सिद्धोधन कदम व शेख नईम यांनी उत्कृष्टरीत्या केले. साथसंगत राज लांबटिळे, स्वप्निल धुळे, भगवानराव देशमुख, रवी कुमार भद्रे, रतन चित्ते यांनी केली. तबल्यावर स्वप्निल धुळे व सिद्धोधन कदम यांनी वाजवलेल्या तोडींनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले.

‘रुपेरी सोनसळा’ या संगीत मैफिलीने केवळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ उजळवला नाही, तर नांदेडकरांच्या हृदयात त्या काळातील सुरांचा सुवास पुन्हा फुलवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो? Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी...
दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा
हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर