डबल नव्हे, ट्रिपल इंजिन सरकार हवे, विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दर्पोक्ती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनो असे लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. महाराष्ट्रात विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, अशी दर्पोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहा म्हणाले, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्यामुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही. मला येथे ट्रिपल इंजिन सरकार हवे. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढून विरोधकांचा सफाया करावा. ते दुर्बिणीनेही दिसणार नाहीत याची काळजी घ्या, अशी दर्पोक्ती शहा यांनी केली.
महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवी सुरुवात करत आहे. डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिह्यांत भाजपचे कार्यालय हवे. देशसुद्धा 100 टक्के पक्ष कार्यालयाच्या दिशेने घौडदौड करत आहे, असे शहा म्हणाले.
भाजपला कुबडय़ांचा आधार नको
2014 मध्ये येथे आम्ही पहिल्यांदाच स्वबळावर लढलो आणि प्रथमच महाराष्ट्राला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर सलग तीन वेळा फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप आता स्वतःच्या बळावर एक मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. भाजप कुठल्या कुबडय़ांचा आधार न घेतादेखील चालते, असे सांगत महायुतीच्या घटक पक्षांनाही शहा यांनी सूचक इशारा दिला.
भाजप काचेच्या घरात राहत नाही – फडणवीस
भाजपच्या नव्या कार्यालयाच्या जागेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप काचेच्या घरात राहत नाही. त्यामुळे आमच्यावर दगड भिरकावण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत आक्षेप फेटाळले. पालिकेचे नियम पाळूनच ही जागा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List