दिल्ली सरकार 121 मोहल्ला क्लिनिक बंद करणार, डॉक्टरसह दोन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार
भाजप सरकारच्या या निर्णयामुळे दोन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. मोहल्ला क्लिनिकच्या अनेक डॉक्टरांनी या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपशासित दिल्ली सरकारने दिल्लीतील 121 मोहल्ला क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे डॉक्टरसह दोन हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. सरकार हे मोहल्ला क्लिनिक बंद करणार आहे, याची कोणतीही पूर्वसूचना कर्मचाऱ्यांना दिली नाही, असा आरोप मोहल्ला क्लिनिक युनियनने केला आहे.
आरोग्य सचिवाच्या निर्देशानुसार, आम आदमी मोहल्ला का@र्पोरेशन (एएएमसी) च्या राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज पुमार गुप्ता यांनी नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरांना एक यादी तयार करण्यास सांगितली आहे. ज्यात पावती, औषधे आणि उपभोग्य वस्तू, आरोग्य उपकरण व कार्यस्थळांची सविस्तर माहितीचा समावेश आहे. ही संपूर्ण यादी तयार करून वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 31 मोहल्ला क्लिनिकला बंद करण्याचा उल्लेख करून 121 मोहल्ला क्लिनिक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारकडून आम्हाला केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण (पॅट) च्या आदेशानुसार, दोन आठवडय़ांची नोटीस दिली आहे, असे त्यांनी सांगितले. 21 ऑगस्टला पॅटने दिल्ली सरकारला स्पष्ट आदेश दिले होते की, 31 मार्च 2026 च्या आधी आम आदमी पार्टी (आप) सरकारकडून भरती करण्यात आलेल्या एक हजार कर्मचाऱ्यांना पदावरून हटवू नये.
भाजपने आश्वासन पाळले नाही
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी निवडणुकीत एका रॅलीत बोलताना आश्वासन दिले होते की, मोहल्ला क्लिनिक कर्मचाऱ्यांना आयुष्मान आरोग्य मंदिरात सहभागी करून घेतले जाईल. त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, परंतु दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर रेखा गुप्ता यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. आरोग्य विभागात अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुलाखतीही घेतल्या जात आहे. जे कर्मचारी सध्या काम करत आहेत, त्यांना नोकरीत सामावून घेतले जात नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List