सत्ताधार्यांमध्येच जुंपली; धनंजय मुंडेंनी जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली? सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा सवाल
धनंजय मुंडेंनी निष्ठेच्या गप्पा मारू नये, त्यांची पक्षनिष्ठा मला माहिती आहे. असे विधान अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात दोन ओबीसीचे उमेदवार उभे केले होते. गेवराई आणि आष्टीत सुद्धा त्यांची पक्षनिष्ठा जगजाहिर आहे. जीवनात त्यांनी कोणाशी निष्ठा ठेवली हे एकदा सांगावे असे म्हणत सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.
काल बीडमध्ये ओबीसीच महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना त्यांच्याच गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. माध्यमांशी बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, धनंजय मुंडेंनी कोणाला मदत केली सांगायची गरज नाही. धनंजय मुंडेंना राजकारणात कोणी आणलंय हे त्यांनी सांगावं, फार मोठे झाल्यासारखं त्यांना वाटत असेल त्यांनी जमिनीवर पाय ठेवून बोलावं आणि पक्षनिष्ठाच्या गप्पा तर त्यांनी मारूच नये. त्यांची पक्षनिष्ठा किती आहे हे मला माहित आहे. कारण माझ्या विरोधातच एकाच पक्षाचे असताना दोन ओबीसीचे उमेदवार उभे केले होते. गेवराई मतदार संघातही विजयसिंह पंडितांच्या विरोधात आणि आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्याविरोधात ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यांचीही पक्षनिष्ठा जगजाहिर आहे. त्यांनी पक्षनिष्ठेच्या गप्पा मारू नयेत, जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली हेच त्यांनी सांगावे असे सोळंकी म्हणाले.
तसेच आमच्यावर बोलताना त्यांनी सांभाळून बोलावे कारण मी पाच वेळा आमदार झालोय, विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या वडिलांच्या काळापासून राजकारणात आहेत. धनंजय मुंडेंचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून पंडित कुटुंब राजकारणात आहे. धनंजय मुंडेंचा अभ्यास कमी आहे असे म्हणत त्यांनी लक्ष्मण हाकेंचा समाचार घेतला. लक्ष्मण हाकेंनी बीडमध्ये येवून मोठ्या वल्गना करत जावू नयेत, हाकेंना त्यांच्या मतदारसंघात २५३ मते मिळाली आहेत ते काय आम्हाला मदत करणार? असा सवाल सोळंके यांनी उपस्थित केला.
भुजबळांनी मंत्रीपद सोडून बोलायला पाहिजे
बीडच्या ओबीसीच्या मेळाव्यात छगन भुजबळ जे बोलले, ते कितपत योग्य आहे. कारण तेच मंत्री आहेत असे सोळंके म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये असताना हैदराबाद गॅझेटचा जीआर कॅबिनेटचा निर्णय होता. तरी तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता, त्यांनी त्यांचे मत व्यक्त करावे, त्यांनी बोलावे पण मंत्रीपद सोडून असा प्रतिहल्ला प्रकाश सोळंके यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List