श्रीमंतांच्या यादीत पहिल्यांदाच किंग खान झळकला, वाचा अजून कोण आहे अरबपतींच्या यादीत
हिंदुस्थानातील श्रीमंत व्यक्तींची संख्या वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. नुकतीच एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली. त्यानुसार, हिंदुस्थानातील अब्जाधीशांची संख्या 350 पेक्षा अधिक झाली असून मुकेश अंबानी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूड किंग शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत झळकला आहे. पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुंबई अव्वल स्थानावर आहे. देशातील 451 श्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतात.
हिंदुस्थानातील अब्जाधीशांची संख्या गेल्या 13 वर्षांत सहा पटीने वाढली आहे. M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये समाविष्ट असलेल्या अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 167 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून ती हिंदुस्थानच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) जवळपास निम्मी आहे.
शाहरुख खान श्रीमंतांच्या यादीत सामील
श्रीमंतांच्या यादीत पहिल्यांदाच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान झळकला आहे. शाहरुख खानची एकूण संपत्ती 12,490 कोटी रुपये असून तो देशातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला आहे. 2025 च्या श्रीमंतांच्या यादीत, परप्लेक्सिटीचे संस्थापक 31 वर्षीय अरविंद श्रीनिवास हे 21,190 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत.
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ₹9.55 लाख कोटी इतकी आहे. यामुळे त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा कायम राखला आहे. यानंतर गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 8.15 लाख कोटी रुपये असून संपत्तीच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
रोशनी नादर मल्होत्रा, ₹२.८४ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह, यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्या यादीतील सर्वोच्च क्रमांकाची महिला अब्जाधीश बनल्या आहेत आणि पहिल्यांदाच टॉप ३ मध्ये प्रवेश करून, त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून इतिहास रचला आहे.
संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत नीरज बजाज आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव आहे. बजाज यांच्या संपत्तीत 69,875 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्यांची संपत्ती 2.33 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List