निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे, मतदार यादीवरून संजय राऊत यांची टीका
घोळ घालण्यासाठी भाजपने पॅनल पद्धत आणली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे, टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आता माझ्या बाजूला दिव्याचे रोहिदास मुंडे आहेत. ते कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली यादी घेऊन आले. दिव्यातलेच फक्त 17 हजार 258 दुबार मतदार आहेत. म्हणजे अख्या ठाण्यात महानगरपालिका हद्दीत कल्याण डोंबोवलीत टाकले गेलेले मतदार आहेत. हे मतदार आता प्रत्येक वॉर्डामध्ये पसरवले जातील आणि मतदान केल जाईल, हा विषय गंभीर आहे असं निवडणूक आयोगाला वाटत नाही का? आणि डुप्लिकेट मतदार डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे सांगणारे निवडणूक आयोगा काय झक मारत आहे? निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना डुप्लिकेट आणि बोगस मतदार यादीतून वगळण्याचा यांना अधिकार जर नसेल तर यांना आम्ही आमच्या कराच्या पैश्यांतून का पोसतोय आम्ही? हा साधा प्रश्न मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट असायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, तर ऑनलाईन जे काय मतदार नोंदणी आणि डिलिशन सुरू आहे हा एक मोठा फ्रॉड भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने आणि मिंधे गटाने सुरू केलेला आहे. हे सगळं थांबावं असं निवडणूक आयोगाला वाटत नाही.
आणि हे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याच्या गोष्टी करत आहेत. हे अत्यंत एक एक घाणेरडं प्रकरण आहे. अशा तऱ्हेने या देशातल्या लोकशाहीला तिरडीवर टाकावं लागेल किंवा नव्हे टाकलेलेंच, लोकशाहीची अंत्ययात्रा सुरू आहे.
मतदार याद्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेतली भगवद्गीता आहे. मतदार यादी शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे तर निवडणुका पारदर्शक होईल. आम्ही लोकशाहीमध्ये मतदार यादीला भगवत गीतेचा दर्जा देतोय, तीच जर अपवित्र अशुद्ध असेल तर तुम्ही कोणत्या आधारावर पारदर्शक, निष्पक्ष निवडणुका घेणार? जोपर्यंत मतदार यादी ही स्वच्छ, पारदर्शक निष्पक्ष आणि निर्दोष होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही. विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेवरती आजही लोकांच्या मनात शंका आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे 40- 45 जागांचा घोळ झाला, त्यात शंका आहे. वाराणसी मध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी जिंकून आले. एका घरामध्ये शंभर शंभर मतदार, ध्रुतराष्ट्राचा बाप आहे का? अशा पद्धतीने मतदार यादीतला संपूर्ण देशामध्ये हा गोंधळ असताना निवडणूक आयोग काय करतो आहे?
निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे.
विधानसभेतली मतदार यादी सदोष आहे. हे उघड झाल्यावर तुम्ही त्याच यादीचा आग्रह धरताय, पुन्हा या मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा डुप्लिकेट मतदार आलेले आहेत. जसे काल नाशिक असेल, आता दिव्याचे दाखवतोय आम्ही मुंबईतल्या वॉर्डा वॉर्डामधले आम्ही आकडे दाखवतोय. आम्ही राजकीय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो? कार्यकर्ते पदरमोड करून, दिवस रात्र आम्ही मतदार यादीवर काम करतो आहोत. निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे. निवडणूक आयोग भाजपची यंत्रणा वापरते. निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे.
जर तुम्हाला व्हीव्हीपॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. का घाबरताय तुम्ही? मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजे. मी तर म्हणेन अख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजे तुम्ही. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकास एक निवडणूक झालेल्या आहेत. ही पद्धत घोळ घालण्यासाठी भाजपने आणली आहे. एका एका भागामध्ये चार चार पाच पाच नगरसेवक? लोकांनी जायचं कोणाकडे? चारचा चारचा पॅनल हा काय बकवासपणा आहे. निवडणूक ही एकास एक असते समोरासमोर. मुंबईत तुम्हाला शक्य नाही प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर यांची धुळदाण होईल. हे अनेक वर्षांचा यांचा डाव आहे. पॅनल सिस्टीम हा फ्रॉड आहे.
20 हजार मतदार मी बाहेरून आणलं असं निवडून आलेला मिंधे गटाचा आमदार सांगतोय. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको का? आमची लढाई तिथेच आहे. विधानसभेला 46 लाख मतदार घुसवले गेले, त्याच्यातला एका आमदाराने कबुल केलं की मी 20 हजार मतदार बाहेरून आणले. पैठण मध्ये आम्ही जे मतदार काढलेले आहे ते 56 हजार आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणतात संजय राऊत कोण? त्यांना जर या महाराष्ट्र राज्याचा 25 वर्ष खासदार असलेला माणूस माहित नसेल तर त्यांना त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. जो माणूस या राज्यामध्ये चार वेळा खासदार झालेला आहे आणि युतीमध्येही झाला त्यांच्या आणि नंतरही झाला तर ही बकवासगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करतोय यांची तुम्हाला मानसिक लेवल काय आहे हे कळून घ्यायला पाहिजे. उद्या आम्ही म्हणून मोदी कोण? आम्ही मोदींना उत्तर देतो, आम्ही अमित शहाना उत्तर देतो आम्ही देवेंद्र फडणवीसांना उत्तर देतो. आम्ही असं विचारत नाही हा कोण तो कोण? तुमचं अस्तित्व आहे. शिवसेनेचे अस्तित्व आहे आणि राहणार आणि तुमच्या छाताडावर आम्ही बसणार, देवेंद्र फडणवीस लिहून ठेवा.
बघा बावनकुळे अस म्हणतायत की उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला 51% मतं मिळणार आहेत. हा आकडा त्यांनी कुठून आणला? याचा अर्थ 51 टक्क्यांचा घोटाळा त्यांनी करून ठेवला हा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत आणि बावनकुळे म्हणतात की आम्हाला 51 टक्के मतं मिळणार आहेत. याच्यावरती आम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा मग हा पराभावाच्या मानसिकतेत आहोत अशी टीका होती. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मग पराभव कोणाचा होतो आपल्याला कळेल असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List