ढगफुटीसदृश पावसाचा 423 गावांना फटका; अहिल्यानगरमधील 84 हजार 860 हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान
अहिल्यानगर जिल्ह्यात 20 व 21 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 423 गावे बाधित झाली असून, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भाजीपाला, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी, उडीद, मूग, मका, तूर, केळी, लिंबू, सूर्यफूल, कापूस, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 104 गावांतील 38 हजार 62 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 56 हजार 27 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पाथर्डी तालुक्यात 137 गावांतील 10 हजार 986 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, नऊ हजार 828 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर तालुक्यातील 23 गावांतील चार हजार 547 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून, पाच हजार 376 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
कर्जत तालुक्यातील 61 गावांतील एक हजार 289 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक हजार 289 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील 87 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, 28 हजार 660 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात 28 हजार 660 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
राहाता तालुक्यातील आठ गावांत नुकसान झाले असून, एक हजार 238 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. एक हजार 587 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चार गावांतील 78 हेक्टर क्षेत्रावरील 132 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे.
अतिवृष्टीचा तडाखा
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांत 84 हजार 860 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, एक लाख 16 हजार 841 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यात फळबाग, सोयाबीन, डाळिंब, भाजीपाला, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी, उडीद, मूग, मका, तूर, केळी, लिंबू, सूर्यफूल, कापूस आदी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List