‘रेड झोन’मधील मालमत्तांना करात 50 टक्के सूट; 43 हजार मालमत्ताधारकांना होणार फायदा
संरक्षण विभागाच्या देहू रोड आणि दिघीतील आस्थापनांमुळे बाधित होणाऱ्या तळवडे, चिखली, निगडी, दिघी, भोसरी संरक्षित हद्दीतील (रेड झोन) मालमत्तांना सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाचा ४३ हजार मालमत्ताधारकांना लाभ होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली.
महापालिकेने मालमत्ताकर आकारणीसाठी शहरातील मालमत्तांची ‘अ’, ‘ब’ व ‘क’ अशी वर्गवारी केली आहे. संबंधित भागातील वार्षिक भाडेदरावरून कर निश्चित केला आहे. ‘रेड झोन’बाधित परिसरात भाडेदर अत्यंत कमी आहे. मात्र, त्याचा समावेश विकसित भागाप्रमाणे ‘क’ वर्गामध्ये केला आहे. देहू रोड दारूगोळा कारखान्याच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार आणि दिघी मॅगझिन डेपोपासून एक हजार १४५ मीटर परिघात ‘रेड झोन’ची हद्द आहे. रेड झोन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामेझाली आहेत. त्यामुळे दाट लोकवस्ती झाली आहे. शहरातील इतर भागांच्या तुलनेत रेड झोन भागात महापालिकेकडून पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. इतर क्षेत्राच्या तुलनेने संरक्षित क्षेत्रामध्ये परिपूर्ण विकास होत नाही. त्यामुळे नागरिकांकडून कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करून करसवलत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ‘रेड झोन’बाधित मालमत्तांना सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.
याचा लाभकिवळे, विकासनगर, तळवडे, चिखली, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, भोसरी, दिघी भागांतील ४३ हजार मालमत्ताधारकांना होणार आहे.निर्णयाची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून (२०२६-२७) केली जाणार आहे. या योजनेचा १ एप्रिल २०२६पासून लाभ घेता येईल. ही सवलत घेण्यासाठी ‘रेड झोन’ मधील मालमत्ताधारकांना ३१ मार्च २०२६पर्यंतचा संपूर्ण थकबाकीसह मूळ मालमत्ताकराचा भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. या सवलतीमुळे २५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे.
‘रेड झोन’ हद्दीचा संभ्रम कायम
संरक्षण विभागाने २००२मध्ये देहू रोड दारूगोळा कारखान्याच्या बाह्यसीमाभिंतीपासून दोन हजार यार्डपर्यंतचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून घोषित केले आहे. शहरातील तळवडे, निगडी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, यमुनानगर, रावेत, किवळे, चिखली, दिघी, भोसरी, वडमुखवाडी, चहोली, डुडुळगाव, बोपखेल हा ‘रेड झोन’ने बाधित परिसर आहे. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी या भागांना लागूनही लष्करी आस्थापना आहेत. रेड झोनची हद्द अचूकपणे स्पष्ट व्हावी म्हणून भूमिअभिलेख विभागाने सॅ टेलाइटद्वारे मोजणी केली. त्यास दीड वर्ष होऊनही अंतिम नकाशा तयार झाला नाही. अचूक आणि स्पष्ट सीमा असलेला अधिकृत नकाशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. अचूक नकाशा प्रसिद्ध होत नसल्याने रेड झोन सीमेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अचूक नकाशा लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, अशी मागणी रेड झोनबाधितांची आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List