मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांमध्ये फाईल वॉर! जास्त निधी मिळवण्यासाठी मिंध्यांची धडपड
मिंधे गटातील नऊ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्र्यांनी हे नियम पाळायला सुरूवात केली आहे. उद्योग, आरोग्य, शिक्षण, परिवहन या विभागातील मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचा नियम काटेकोरपणे पाळल्याने त्यांच्या टेबलवर फायलींचा मोठा खच झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघर्षामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव अडकून पडले आहेत अशी माहिती मंत्रालयाती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले कीशिंदे यांनी हा आदेश दिल्यानंतर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलची करून दिली. त्यानुसार या फाईल्स आधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकजडे जातात. त्यानंतर शिंदे आणि शेवटी मुख्यमंत्री फडणवीसांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवायच्या असतात. महायुती सरकार डिसेंबरमध्ये स्थापन झाल्यानंतर सर्वसाधारण प्रशासन विभागानेही हा प्रोटोकॉल पाळला होता. पण एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर त्यांच्या गटातील मंत्र्यांनी शिंदेंकडे आपल्या फाईल्स पाठवल्या आहेत.
“शिंदे यांच्या आदेशामुळे प्रोटोकॉलचे उल्लघंन होत आहे असे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या गटाला कमी निधी मिळतो असे एकनाथ शिंदे यांना कळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना हा आदेश दिला. नियमानुसार, सर्व पक्षांच्या मंत्र्यांना निधी समान पद्धतीने वाटप केला जाणे अपेक्षित होतं. पण शिंदे हे शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिक निधी मिळावा यासाठी आग्रही होते, असे एका शिवसेना नेत्याने सांगितले. शिंदे यांनी आपल्या एका मंत्र्याला फडणवीस यांची वारंवार भेट घेतल्याबद्दल झापले होते, कारण त्यांना वाटत होते की त्या मंत्र्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या प्रभावाखाली तयार होत होते. पक्षाला जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून शिंदे त्या प्रमाणे प्रस्ताव तयार करतातअसे या नेत्याने सांगितले.
दुसरीकडे, विधानसभा मतदारसंघांतील योजनांसाठीचा विशेष निधी शिवसेना आमदारांना दिला जात आहे, आणि भाजप आमदारांना डावलले जातंय अशी तक्रार भाजपच्या आमदारांनी फडणवीसांकडे केली. महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव विशेष सहाय्य निधी, जो नगरविकास विभागाच्या मंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून असतो, तो एका पक्षाच्या मतदारसंघांकडे वळवण्यात येत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून असे होत आहे. निधीवाटपात पक्षपातीपणा होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
‘फाइल वॉर’ बाबत विचारले असता, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की तीनही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. फायलींवरून सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत भांडण किंवा मतभेद आहेत, याचा सामंत यांनी इन्कार केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List