वाढदिवसानिमित्त देवाभाऊंवर कौतुकवर्षाव; संधी आहे, फडणवीस दिल्लीत जातील, उद्धव ठाकरे, पवार यांच्याकडून शुभेच्छा!

वाढदिवसानिमित्त देवाभाऊंवर कौतुकवर्षाव; संधी आहे, फडणवीस दिल्लीत जातील, उद्धव ठाकरे, पवार यांच्याकडून शुभेच्छा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 56 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतून काैतुकवर्षाव झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देवाभाऊंच्या कार्याची प्रशंसा केली. फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी आहेत. त्यांना संधी आहे. भविष्यात ते दिल्लीत जातील. केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, अशा शुभेच्छा दोन्ही नेत्यांनी दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राचा नायक’ हे कॉफीटेबल बुक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा राजकीय प्रवास, त्यांचे कार्य, नेतृत्वक्षमता आणि कामाची धडाडी यावर भाष्य केले आहे. वडिलांचा राजकीय वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत. एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशी प्रतिमा असलेल्या फडणवीस यांनी समोर आलेल्या आव्हानांवर अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करून स्वतःची विश्वासार्हता वाढवली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात शिवसेना त्यांच्यासोबत होती. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी असलेल्या फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय काैशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा! असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनीही या कॉफीटेबल बुकमध्ये फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला माझा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ आठवतो. फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभीष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आमच्या दोघांच्याही कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळय़ात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. पण मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, असे काैतुक शरद पवार यांनी केले आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाडय़ाबाहेरील क्षितिजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी आभारी आहे!

उद्धव ठाकरे यांच्या लेखाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. महाराष्ट्रात आपण केवळ वैचारिक विरोधक आहोत. कुणीच कुणाचा शत्रू नाही. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, असे फडणवीस म्हणाले. शरद पवार यांचेही मी आभार मानतो. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मत माझ्यासाठी मोलाचे आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या कलाक्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिप- हॉपच्या दुनियेतील प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाईचा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला...
Health Tips – हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
Health Tips – दररोज चालण्यामुळे मधुमेहाला कराल कायमचा रामराम, वाचा
कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण : आरोपी गोकुळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
माझ्याच घरात माझा छळ होत आहे, खूप उशीर होण्यापूर्वी कोणीतरी मला मदत करा! अभिनेत्री तनुश्री दत्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण पोलिसांना शरण, तत्काळ जामीन मंजूर
नालासोपाऱ्यात ‘दृश्यम’… प्रियकराच्या मदतीने पत्नीने हत्या करून पतीला पुरले, नव्या टाइल्सने उकरला घरात गाडलेला मृतदेह