संतापजनक घटना… पोटात लाथा घातल्या, केस पकडून उचलून आपटले; कल्याणमध्ये मराठी स्वागतिकेला परप्रांतीय तरुणाकडून अमानुष मारहाण
भाईंदरमधील परप्रांतीयांच्या मुजोरीचे प्रकरण ताजे असतानाच आज कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाने रुग्णालयातील मराठी स्वागतिकेवर जीवघेणा हल्ला केला. नांदिवलीतील श्री बाल चिकित्सालय येथे रुग्ण महिलेसोबत आलेल्या गोकुळ झा याने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरे हिने डॉक्टर बिझी आहेत, पाच मिनिटे थांबा, असे सांगताच त्याचा राग अनावर झाला. काही कळायच्या आतच मुजोर गोकुळने धिंगाणा घालत तरुणीच्या पोटात लाथा घालत अमानुष मारहाण केली. तिचे केस पकडून खाली आपटून विनयभंग केला.
रुग्णालयातील काहींनी नराधमाच्या तावडीतून पीडित तरुणीची सुटका केल्याने तिचा जीव वाचला. या बेदम मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच कल्याण, डोंबिवलीत संताप व्यक्त झाला. मारहाणीनंतर पसार झालेल्या गोकुळला कल्याणच्या नेवाळी नाका परिसरातून आज रात्री 10 वाजता अटक करण्यात आली. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली गावात डॉ. अनिकेत पालांडे यांचे श्री बाल चिकित्सालय रुग्णालय आहे. संध्याकाळी या रुग्णालयात धक्कादायक अमानुष घटना घडली. रुग्णालयात एक रुग्ण महिलेसोबत गोकुळ झा हा तरुण आला. त्याने डॉक्टरांना भेटायचे आहे असे सांगितले. यावेळी रिसेप्शनिस्टचे काम करणाऱया सोनालीने डॉक्टर बिझी आहेत, पाच मिनिटे थांबा, अशी विनंती केली. मात्र तू कोण मला अडवणारी, असे उद्धटपणे म्हणत मुजोर गोकुळ वाद घालू लागला. यावर सोनालीने थोडा वेळ थांबा असे पुन्हा एकदा नम्रपणे सांगितले. मात्र गोकुळ संतापला. माथेफिरूने थेट सोनालीला शिव्या देत मारहाण सुरू केली. पोटात लाथ घालत केस पकडून जमिनीवर आपटले. काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तरुणीची सुटका केली. अमानुष मारहाण केल्यानंतर गोकुळ झा तेथून पसार झाला. निरपराध तरुणीला मारहाण झाल्याचे समजताच रुग्णालय परिसरात संताप व्यक्त झाला. काही नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गोकुळ झाविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीला शिवसैनिकांनी दिला धीर
सोनालीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तिला धीर देण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि शिवसैनिक रुग्णालयात गेले. या वेळी त्यांनी तिची विचारपूस केली व कुटुंबीयांना धीर दिला. शिवसेनेने सोनालीला आर्थिक मदतही केली. या वेळी जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, माजी महापौर रमेश जाधव, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहर प्रमुख शरद पाटील, किशोर मानकामे, विलास म्हात्रे, राहुल चौधरी, नारायण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेच्या दणक्यानंतर पोलिसांनी तपासाची चव्रे फिरवली आणि रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.
पीडित तरुणी रुग्णालयात
विकृत गोकुळ झा याने एखाद्या रेसलरप्रमाणे पीडितेला मारहाण केली. धावत येऊन सोनालीच्या पोटात लाथ घालताच ती कोसळली. त्यानंतरही माथेफिरूने तिचे केस पकडून उचलून तिला जमिनीवर आपटले. या अमानुष मारहाणीत सोनालीला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान गोकुळ झा याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. 20 तास उलटूनही पोलिसांच्या हाती तो लागलेला नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List