मराठी ही मुघलांना विरोध करणाऱ्या साम्राज्याची भाषा, जेएनयूच्या कुलगुरूंनी केले कौतुक
महाराष्ट्रात हिंदी सक्तीला होत असलेल्या विरोधावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतश्री धुलिपुडी पंडित यांनी आज परखड भूमिका मांडली. ‘शिक्षणात माझे पहिले प्राधान्य मातृभाषेलाच असेल असे सांगतानाच, ‘मराठी ही मुघलांना विरोध करणाऱया महान मराठा साम्राज्याची भाषा आहे हा इतिहास समजून घेतला पाहिजे,’ अशा शब्दांत धुलिपुडी यांनी मराठीचे कौतुक केले.
त्रिभाषा सूत्रावरही त्यांनी मत मांडले. ‘भाषा ही खूप महत्त्वाची आहे, मात्र माझे पहिले प्राधान्य मातृभाषेला आहे. मातृभाषेत जे काही असते ते खूपच महत्त्वाचे असते. इतर दोन भाषेमध्ये तुम्ही जिथे राहता, शिकता तिथल्या बाजारपेठेची भाषा असावी आणि तिसरी तुमच्या करिअरची भाषा असावी. करिअरसाठी जे काही गरजेचे असेल ते शिकायला हवे आणि ते प्रत्येकावर सोडले पाहिजे. बहुभाषिकतेमध्ये संख्या महत्त्वाची नाही. मला आठ भाषा येतात. त्यामुळे तुम्हाला जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. भाषा हे द्वेष किंवा श्रेष्ठत्वाचे साधन म्हणून वापरले जाऊ नये. ते संवादाचे माध्यम असावे, असे शांतश्री म्हणाल्या.
शिवरायांची युद्धनीती नव्या शैक्षणिक धोरणात
भारतीय भाषा आणि ज्ञान प्रणालींवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने जेएनयू दोन नवीन केंद्रे सुरू करणार आहे. त्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यास केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती केंद्राचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हादेखील नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या महान प्रतीकांपैकी एक आहेत. त्यांचे युद्धनीती, संरक्षणविषयक कल्पना याचे प्रतिबिंब भविष्यातील धोरणात पडले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List