‘अविश्वासा’मुळेच धनखड यांचा राजीनामा, एक कॉल आला आणि तडकाफडकी निर्णय, न्या. वर्मा यांच्याविरुद्धच्या ठरावाने ठिणगी पडली
संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगाचा प्रस्ताव यासाठी कारण ठरल्याची चर्चा आहे. विरोधकांनी दिलेला महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करून घेतल्याने धनखड व केंद्र सरकारमध्ये अविश्वासाची ठिणगी पडली. या कृतीचा जाब विचारण्यात आल्याने धनखड यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांकडून समजते. काँग्रेसने यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, दिवसभर कामकाजात भाग घेणाऱया धनखड यांनी दिलेले हे कारण कोणालाही पटलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळी अधिवेशनात न्या. वर्मा यांच्यावर महाभियोग आणण्याचा प्रस्ताव सत्ताधारी देणार होते. त्यासाठी सरकारकडून तयारीही करण्यात आली होती. मात्र, राज्यसभेत पहिल्याच दिवशी विरोधकांनी हा प्रस्ताव दिला. उपराष्ट्रपतींनी सभागृह नेत्यांना विश्वासात न घेता तो तात्काळ मंजूर करून कार्यवाहीसाठी पाठवला. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराला लक्ष्य करण्याची सत्ताधाऱयांची संधी हुकली. त्यातून धनखड व केंद्र सरकारमध्ये ठिणगी पडली. धनखड यांनी राजीनामा देताना प्रकृतीचे कारण दिले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, पण त्यांच्या या निर्णयामागे काहीतरी वेगळी कारणे असावीत. त्यांची प्रकृती उत्तम दिसत होती,’ असे काँग्रेसचे खासदार जयराम रमेश आज म्हणाले.
नड्डांनी उपराष्ट्रपतींचा अपमान केला – संजय राऊत
‘सभागृह नेते असलेले जेपी नड्डा यांनी काल सभापतींचे अधिकार स्वतःकडे घेतले. जे सभापतींनी सांगायला हवे, ते नड्डा बोलत होते. हा संविधानानुसार पदावर बसलेल्या सभापतींचा अपमान आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नेड्डा यांच्यावर हल्ला चढवला.
…आणि धनखड यांना कुणकुण लागली!
धनखड यांनी विरोधकांनी दिलेला महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सत्ताधारी गोटात नाराजी होती. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला मंत्र्यांची अनुपस्थिती त्याचेच द्योतक होती. ‘आम्ही जे बोलू तेच रेकॉर्डवर राहील, विरोधकांचे नाही, असे जेपी नड्डा राज्यसभेत बोलले. धनखड हे सभापतींच्या खुर्चीवर असताना नड्डा यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे सभापतींना कमी लेखण्याचाच प्रकार होता. धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मुरब्बी राजकारणी असलेल्या धनखड यांनी हे ओळखले आणि सरकारने डाव खेळण्याआधीच राजीनामा देत तो उधळून लावला.
‘त्या’ साडेतीन तासांत काय घडले…
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्याला धनखड व मंत्रीही होते. नंतर पुन्हा साडेचारला बैठक घेण्याचे ठरले. मात्र, तेव्हा मंत्री जे.पी. नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू नव्हते. बैठकीनंतर धनखड यांनी राजीनामा दिला. त्यामुळे दुपारी 1 ते 4.30 दरम्यान नक्कीच काहीतरी गंभीर घडले असावे, असा संशय काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
15 तास पंतप्रधानांसह भाजप नेत्यांचे मौन
धनखड यांच्या राजीनाम्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सत्ताधारी गोटात शांतता आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 15 तास भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. आज दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली. ‘धनखड यांना उपराष्ट्रपती पदासह विविध भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो,’ असे मोदी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List