विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक म्हणजे मतचोरी केल्याचाच पुरावा: अतुल लोंढे
महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे आणि हे परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पुन्हा पकडली आहे. आपण अपराधी आहोत, चोरी करत आहोत याचा पुरावा ते देत आहेत. महाराष्ट्रात चोरी पकडली गेली आहे. मतचोरीचे पुरावे लपवण्यासाठी आयोगाने कायद्यातही बदल केले. चंदिगड उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयोगाने सीसीटीव्ही फुटेज, मशिन रिडेबल व्होटर लिस्ट संदर्भातील कायदा बदलला. आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक परिपत्रक काढले आहे. लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेले नाही तर चोरीचे सरकार महाराष्ट्र व हरियाणात आणलेले आहे, हे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. आता बिहारमध्ये चोरीचा वेगळा प्रकार सुरु केला आहे, यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले पाहिजे, मतदानाची चोरी केलेले सरकार संविधान संमत असू शकत नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List