शस्त्रास्त्रे दिली तर मॉस्कोवर हल्ला कराल काय? रशियावर संतप्त झालेल्या ट्रम्प यांची झेलेन्स्कींना ऑफर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. तसेच त्यांनी रशियालाही युक्रेनशी 50 दिवसात शांतता करार करा, अन्यथा कठोर निर्बंध लादले जातील, असा इशाराही दिला आहे. मात्र, रशियाने याला अपेक्षित प्रतिाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना एक ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
ट्रम्प यांनी फोनकॉल दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्कीला मॉस्कोवर हल्ला करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यानी झेलेन्स्कींना विचारले की, जर अमेरिकेने त्यांना लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे दिली तर तुम्ही रशियाची राजधानी मॉस्कोवर हल्ला कराल का? ट्रम्प यांनी झेलेनस्कींना दिलेल्या या ऑफरमुळे रशिया- युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा 4 जुलै रोजी झाल्याचे सांगण्यात येते. ट्रम्प यांचे हे संभाषण रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या त्यांच्या आश्वासनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे ज्यामध्ये ते युद्ध आणखी भडकवण्याबद्दल बोलत आहेत. झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या फक्त एक दिवस आधी ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. ट्रम्प यांचे पुतिन यांच्याशी झालेले संभाषण यशस्वी झाले नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक नसल्याचे सांगितले.
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार करण्याचे आश्वासन देऊन ट्रम्प सत्तेत आले होते आणि त्यांनी म्हटले होते की ते राष्ट्रपती झाल्यानंतर 24 तासांच्या आत युद्ध थांबवतील, परंतु आतापर्यंत असे झालेले नाही. ट्रम्प यांना रशिया-युक्रेन युद्ध लवकरात लवकर थांबवायचे आहे आणि दरम्यान त्यांना नोबेल पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. परंतु ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार पुतिन घाईघाईने त्यांच्या अटींवर युद्धबंदी करण्यास तयार नाहीत, ज्यामुळे ट्रम्प दररोज पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
पुतीन यांच्याशी चर्चा अपयशी झाल्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी दुसऱ्याच दिवशी 4 जुलै रोजी ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना फोन करून विचारले की जर आम्ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली तर ते रशियाच्या अंतर्गत भागात, राजधानी मॉस्कोमध्ये असलेल्या लष्करी तळांवर हल्ला करतील का? ट्रम्प यांनी विचारले की, ‘व्होलोडिमिर, तुम्ही मॉस्कोवर हल्ला करू शकता का? … तुम्ही सेंट पीटर्सबर्गवरही हल्ला करू शकता का?’ यावर झेलेन्स्की म्हणाले, ‘अगदी. जर तुम्ही आम्हाला शस्त्रे दिली तर आम्ही करू शकतो,’ असे झेलेन्स्की म्हणाले. ट्रम्प- झेलेन्स्की यांच्यातील चर्चेने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List