वसई किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत घ्या, दुर्गप्रेमींची मागणी
महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईचा किल्लादेखील विविध ऐतिहासिक घडामोडींचा प्रमुख साक्षीदार असल्याने या किल्ल्याचासुद्धा युनेस्कोच्या यादीत समावेश करावा, अशी आग्रहाची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावादेखील सुरू करण्यात आला आहे.
वसई किल्ला हा भुईकोट असून 110 एकर क्षेत्रफळामध्ये तो पसरलेला आहे. मुघल, पोर्तुगीज, मराठा आणि नंतर इंग्रजांची दीर्घ राजवट किल्ल्याने अनुभवली आहे. पोर्तुगीज सत्तेविरोधात मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेताना तब्बल दहा हजार सैनिकांचे रक्त सांडले होते. मात्र अद्यापही या किल्ल्याचा दुर्मिळ वारसास्थळ यादीत समावेश झालेला नाही.
केंद्राकडे पत्रव्यवहार
इतिहासामध्ये वसईचा रणसंग्राम अतिशय महत्त्वाचा समजला जातो. नरवीर चिमाजी अप्पा यांनी 1739 साली मोठी लढाई करून तो जिंकला. या किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाल्यास निधी उपलब्ध होऊन त्याची डागडुजी करता येईल, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी शिवप्रेमी नितीन म्हात्रे व त्यांचे सहकारी केंद्रीय पर्यटन मंत्रालय, पुरातत्व विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List