माढ्यातून लढण्यासाठी प्रशांत परिचारकही इच्छुक, भाजपमधील तिढा वाढतोय!
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. भाजपने माढय़ातून रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकर गट आक्रमक झाला आहे. त्यातच आता पंढरपुरातील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपचा तिढा वाढतच चालला आहे.
रामराजे, बबनदादा, संजयमामा यांच्यासह अनेकांनी मला माढा लोकसभेला उभे राहण्याचा आग्रह केला होता. मला उभे राहण्याची इच्छा नाही. मात्र, पक्षाने जबाबदारी दिली, तर आपण लढण्यास इच्छुक आहोत, असे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. माढय़ात रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना परिचारक यांनी उडी घेतल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षश्रेष्ठाRसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपने बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांना सतर्क ठेवून निवडणुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोलापूर, माढा आणि सांगली या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास प्रशांत परिचारक यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या नावावर एकमत होईल अशी चर्चा होती, असे विचारले असता, परिचारक म्हणाले, ‘तशी चर्चा होती. मला सगळ्यांनी ऑफरपण दिली होती; पण मी उमेदवारी मागितलेली नाही. तुम्ही असाल तर आमचा विरोध नाही, असे रामराजे, बबनदादा, संजयमामा यांच्यासह अनेकांनी मला सांगितले होते. पक्षाने उमेदवारी दिली असती तर लढलो असतो. पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला थांबायला सांगितले, तेव्हा आपण थांबलो होतो. तसे आता लोकसभा लढायला सांगितले असते, तर लढलो असतो,’ असे परिचारक यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List