ऐतिहासिक फलटणमध्ये माउलींचे जंगी स्वागत

ऐतिहासिक फलटणमध्ये माउलींचे जंगी स्वागत

>> सुरेंद्र ननवरे

टाळ-मृदंगांचा गजर अन् माउली…माउलीच्या अखंड जयघोषात, अशा भक्तिमय वातावरणात दरमजल करीत निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा आज ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. फलटणकरांच्या वतीने माउलींचे भव्य स्वागत करण्यात आले.

माउलींच्या पालखी सोहळय़ातील ‘चांदोबाचा लिंब’ येथील पहिले उभे रिंगण आणि तरडगाव येथील मुक्काम संपवून वारकरी पहाटेपासूनच फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाले. तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखीमार्गावरील काळज येथे सकाळची न्याहरी, निंभोरे येथे दुपारचा नैवेद्य आणि सुरवडीसह आदी गावोगावचे स्वागत स्वीकारून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो भक्तांसोबत संध्याकाळी महानुभव पंथीयांच्या आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशी असलेल्या ऐतिहासिक फलटणनगरीत दाखल झाला.

फलटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ जिंती नाका येथे सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी सोहळा येताच, आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

माउलींचा रथ विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. माउलींचा पालखी सोहळा फलटण, सद्गुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौकमार्गे ऐतिहासिक आणि प्राचीन श्रीराम मंदिराजवळ सायंकाळी 5.30च्या सुमारास आल्यानंतर नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि फलटण संस्थानच्या वतीने माउलींचे स्वागत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी जि. प. सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

पुढे पालखी सोहळा गजानन चौक, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, गिरवी नाकामार्गे विमानतळावर मुक्कामासाठी विसावला. यानंतर पालखीतळावर वारकरी, भाविक, आजूबाजूच्या गावांतून आलेले ग्रामस्थ, फलटणचे नागरिक यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. त्यानंतर फलटणकरांनी माउलींच्या दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लावल्या होत्या.

‘ज्ञानोबा-माउली तुकाराम’चा जयघोष आणि विठ्ठलनामाचा जप करीत माउलींचा पालखी सोहळा फलटणनगरीत विसावला आहे. फलटण पालिकेच्या वतीने विमानतळावरील पालखीतळावर वीज, पिण्याचे पाणी, मोबाइल, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या वतीने आरोग्य पथक, औषध, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, मोबाइल आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पुरेसा धान्य, रॉकेल व गॅस सिलिंडरचा साठा तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोहळ्यातील भाविकांच्या सेवेत फलटणकरांच्या वतीने कोणतीही कमतरता येऊ नये, याची खबरदारी नागरिक व प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत होती. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रांतील संघटना, विविध गणेशोत्सव मंडळांनी वारकऱयांसाठी खास भोजन, नाष्टा, चहा, पाणी, औषधोपचार, मॉलिशची सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. माउलींचा पालखी सोहळा उद्या (दि. 29) सातारा जिह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे पोहोचणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;