ड्राप चोरीचा बारा तासांत छडा; करमाळ्यातील तिघांना मुद्देमालासह अटक

ड्राप चोरीचा बारा तासांत छडा; करमाळ्यातील तिघांना मुद्देमालासह अटक

स्वस्तात सोने देतो, असे सांगून संभाजीनगर जिह्यातील चिखलठाणा गावातील ज्ञानेश्वर श्यामराव टेकाळे यास करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील भामटय़ांनी रोख रक्कम दीड लाखांसह दुचाकी पळवून फसविले होते. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर करमाळा पोलिसांनी अवघ्या बारा तासांतच दुचाकी व रोख रकमेसह तिघांना अटक केली. करमाळा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर टेकाळे यांची करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील सविता छगन शिंदे हिच्याबरोबर चार महिन्यांपूर्वी मांढरदेवी येथे ओळख झाली होती. ओळखीनंतर सविता शिंदे हिने टेकाळे यांचा विश्वास संपादन करून माझ्याकडे 35 तोळे सोने असून, शेतीच्या कामांसाठी मला ते स्वस्तात विकायचे आहे, असे सांगून सोने बघायला बोलावले.

15 मे रोजी ज्ञानेश्वर टेकाळे व सतीश काळे करमाळय़ात आले. त्यांना आरोपी सविता शिंदे व छगन शिंदे याने एक सोन्याची अंगठी व नथ दाखवली. कमी किमतीत सोने मिळत असल्याच्या लालसेने फिर्यादी ज्ञानेश्वर टेकाळे व मित्र सतीश काळे पैसे घेऊन पुन्हा 10 जूनला करमाळा एसटी बसस्थानकावर आले. यावेळी, ‘सोने घरी आहे’, असे सांगून सविता छगन शिंदे, छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेश्वर बिरक्या शिंदे, संतोष दिलीप शिंदे यांनी टेकाळे व काळे यांना घरी घेऊन न जाता पांडे शिवारातील वन विभागातील जगंलात नेऊन मारहाण करून रोख दीड लाख व दुचाकी हिसकावून घेतली. यानंतर फिर्यादी ज्ञानेश्वर टेकाळे यांनी करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व वरिष्ठांना माहिती देऊन पथक तयार करून गुह्याचा तपास लावण्याची सूचना केली. घटनेच्या अनुषंगाने तपास करीत असताना अवघ्या बारा तासांत मुद्देमालासह तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील फरारी महिलेचा शोध सुरू आहे

पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे, विलास भराटे, अजित उबाळे, मनीष पवार, योगेश येवले, मिलिंद दहिहंडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, रविराज गटकुळ, हरिदास निमगिरे, रमेश फुगे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

‘ड्राप’ म्हणजे काय?

काही विशिष्ट समाजाचे लोक इतर ठिकाणच्या लोकांबरोबर ओळख करून त्यांना विश्वासात घेऊन आमच्याकडे कमी किमतीत सोने आहे, असे सांगून बोलावून घेतात व वस्तू न देता आडरानात नेऊन मारहाण करत लुटतात. मध्यंतरी नवरी देतो, काळे मांजर, कासव, मांडूळ देतो, असे सांगूनदेखील असे प्रकार केले जायचे याला ‘ड्राप’ म्हणतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;