देशात दडपशाही सुरू, मला अटक झाली तरी आश्चर्य वाटू देऊ नका
या देशात इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून आजवरचा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे घडले असल्याने या विषयावरील लक्ष वळविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असावी असे बोलले जात असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. देशात दडपशाही सुरु असून मला अटक झाली तरी आश्चर्य वाटू देवू नका, असेही त्या म्हणाल्या.
सरकारी डेटानुसार इडी, सीबीआय यांच्याकडून झालेल्या कारवायांपैकी 95 टक्के कारवाया भाजपच्या विरोधी असलेल्या पक्षातील लोकांवर झाल्या आहेत. देशात यापूर्वी आणिबाणीला भाजपने विरोध केला होता. पण आता अघोषित आणिबाणी सुरू आहे. अनेकजण एजन्सीजच्या कारवाईच्या भितीपोटी निर्णय घेतात. लोक घाबरतात, कारण फॅमिली, मुलेबाळे असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. अदृश्य शक्ती भिती दाखवून त्यांना आपल्याकडे वळवते. या शक्तीविरोधात आमचा लढा आहे.
मी कांद्याला दर मागितला तर माझे निलंबन केले. काळ्या मातीशी इमान राखणाऱया शेतकऱयाचे प्रश्न मांडले म्हणून निलंबनच काय फाशी दिली तरी चालेल. पण मी अन्याय, भ्रष्टाचाराविरोधात लढतच राहणार असे सांगून खा. सुळे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवणे हा आणिबाणीचाच प्रकार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुत्र प्रेमापोटी शिवसेना व मुलीच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी फुटल्याच्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विधानावर सुळे म्हणाल्या, त्यांचा हा आरोप यापूर्वीच्या आरोपांपेक्षा फारच प्रेमळ आहे. पूर्वी ते आमच्यावर करप्ट पार्टी म्हणून आरोप करायचे. आता तसा आरोप होत नाही. भ्रष्टाचारापेक्षा मुलावर, मुलीवर प्रेम असणे कधीही चांगले.
मताचे दान देतील का माहीत नाही
हर्षवर्धन पाटील हे माझ्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने मोठे आहेत. त्यांना धमकावण्याचा प्रकार घडल्यानंतर मी जाहीरपणे त्यांच्यासोबत उभी राहिले. वयाने मोठे असलेल्यांचा आदर ठेवण्याचे संस्कार माझ्यावर आहेत. ते मतपेटीतून आभार मानतील का, हे मी सांगू शकत नसल्याचे सुळे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List