मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; विविध भागांतील रस्ते जलमय

मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; विविध भागांतील रस्ते जलमय

दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे निगडी, आकुर्डी, मोशी, संत तुकारामनगर, चिखली परिसर, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, चिंचवड, विविध भागांतील भुयारी मार्गासह रस्ते जलमय झाले होते. सांगवी परिसरात काही घरांत पाणी शिरले तर, आकुर्डीत एक झाडही कोसळले. पाण्यातूनच वाहनचालक, नागरिकांना वाट काढावी लागली. त्यामुळे महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या कामांचा एकप्रकारे फज्जाच उडाल्याचे दिसून आले.

हवामान खात्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याला 27 मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून जोरदार सरी बरसत होत्या. सोमवारी (दि. २६) सकाळपासून शहराच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठमोठे खड्ढेही पडले आहेत. निगडीतील टिळक चौक ते बजाज ऑटोपर्यंतच्या मार्गाला ओडयाचे स्वरूप आले होते. यातून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ होऊन काही वेळ कोंडी झाली होती.

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील गुरुव्दारा चौक परिसरात प्रचंड पाणी तुंबले होते. भुयारी मार्गात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. भोसरी एमआयडीसी, शांतीनगर, पिंपरीतील डी. वाय. पाटीलकडून भोसरीला जाणारा रस्ता, मोशीतील लक्ष्मी चौक, भारतमाता चौक, जाधववाडीतील सरकार चौक, आकुर्डी-प्राधिकरणातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. शहरातील विविध सखल भागांमध्ये तळेसदृश्य पाणी साचले होते. सांगवीतील पवारनगर येथे घरात पाणी शिरले होते. आकुर्डीतील गंगानगर येथे एक झाड कोसळले होते. संत तुकारामनगर, वल्लभनगर या भागातील रस्ते जलमय झाले होते.

याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, सद्यः स्थितीत कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काही वेळ लागतो. यातूनच पाणी साचण्याचे प्रकार होत आहे. सोमवारी सांगवीसह शहरातील काही ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या. उपाययोजना करून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर केले.

पवना धरणातील पाणीसाठा 26 टक्क्यांवर
पवना धरण परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. २६) धरण परिसरात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारीही धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २६.५० टक्क्यांवर गेला आहे. यंदा पावसाळा लवकर सुरू झाला आहे. असे असले तरी मान्सूनपूर्व पाऊसही जोरदार कोसळला. तीन चार दिवसांपासून धरण परिसरात दररोज थोडाफार तरी पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. सोमवारी धरणात २६.५० टक्के पाणीसाठा झाला. गतवर्षी २६ मे अखेर धरणात २५.४३ टक्के इतका पाणीसाठा होता, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश चरिया यांनी दिली.

शहरातील नालेसफाई पूर्ण झाली असली तरी काहीवेळा रस्त्यावर आलेला कचरा पाण्यामुळे चेंबरवरील झाकणाला अडकतो. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच ज्या ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याठिकाणी कर्मचारी पाठवून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. देवन्ना गड्डूवार, सहशहर अभियंता, स्थापत्य विभाग पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;