गुडघ्यांवर पायऱ्या चढून मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिरात पोहोचली ‘ही’ मुस्लीम अभिनेत्री
देवाकडे मागितलेला एखादा नवस किंवा इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त विविध मार्गांनी देवाचे आभार मानतात. त्यासाठी काहीजण आपल्या इष्ट देवाच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात. तर काहीजण अनवाणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचतात. यात अनेकजण कठोर पर्यायसुद्धा अवलंबतात. मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यांवर चढून देवाच्या दर्शनासाठी जाणारेही अनेक भक्त असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या अतरंगी आणि चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेदचा हा व्हिडीओ आहे. उर्फी नुकतीच मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ शिव मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. परंतु यावेळी ती गुडघ्यांवर बसून मंदिरात जात असल्याचं पहायला मिळालं. उर्फीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
या व्हिडीओमध्ये उर्फीने जीन्स आणि करड्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. त्यावर तिने डोक्यावर दुपट्टा आणि चेहऱ्याला मास्क लावला आहे. उर्फी बाबुलनाथ शिव मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यांवर बसून चढताना पहायला मिळतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंदही पहायला मिळतोय. उर्फीचा एखादा नवस पूर्ण झाला असावा, म्हणून ती अशा पद्धतीने शिव मंदिरात जात असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे.
उर्फी स्वत: मुस्लीम असल्याने अशा पद्धतीने मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जाणं चुकीचं असल्याचं मत काहींनी मांडलंय. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुझ्या मुस्लीम असण्याचा धिक्कार’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्रसिद्धीसाठी ही काहीही करू शकते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘उर्फी.. तू माझं मन जिंकलंस’ अशा शब्दांत काहींनी कौतुकसुद्धा केलं आहे.
उर्फी तिच्या अजब-गजब फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो-व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जातं. मात्र कधी कधी तिच्या प्रेमळ स्वभावामुळे नेटकरी कौतुकही करतात. उर्फी आता जरी तिच्या अजब स्टाइलमुळे प्रकाशझोतात आली असली तरी इथवर पोहोचण्यासाठी तिने बराच संघर्ष केला आहे. दरम्यान उर्फीने अशा पद्धतीने मंदिरात जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने विविध मंदिरात जाऊन पूजा-प्रार्थना केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List