वडगाव पुलावर थरार! मद्यधुंद चालकाच्या मर्सिडीजने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
पुणे शहरातील वडगाव उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे मद्यधुंद मर्सिडीज चालकाने दुचाकीस्वार तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला असून तर सहप्रवाशी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की भरधाव मर्सिडीज कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट उड्डाणपुलावरून रस्त्यावर कोसळली. कारमधील ‘एअर बॅग’ यंत्रणा उघडल्याने चौघे बचावले. या प्रकरणी कारचालक तरुणासह चौघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल हुशार असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र प्रज्योत पुजारी हा जखमी झाला आहे. अपघात प्रकरणात कारचालक शुभम राजेंद्र भोसले याला ताब्यात घेण्यात आले आहे. भोसलेसह त्याचे मित्र निखिल रानवडे, श्रेयस सोळंकी, वेदांत रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारमधील दोघेदेखील जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी शुभम शुक्रवारी रात्री चौघा मित्रांसोबत हिंजवडी भागातील एका ढाब्यावर गेले होते. तेथे त्यांनी मद्यपान केले. जेवणानंतर ते भरधाव वेगात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने खेड शिवापूरला निघाले असता बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे बाह्यवळण मार्गाने चिंचवडकडे निघाले होते. भरधाव कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात कुणालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्याच्याबरोबर असलेला मित्र प्रज्योत गंभीर जखमी झाला. कुणाल आणि प्रज्योत यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र कुणालचा मृत्यू झाला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत कारमधील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट दिली.
…दोन दिवसांत तीन मृत्यू
वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण गावडे-पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालक गोपाल शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी पंपनीत कामाला होते.
…ते कीर्तन ठरले शेवटचे
अपघातात मृत्युमुखी पडलेला कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे धनकवडीतील श्री शंकर महाराज मठात शुक्रवारी रात्री आले होते. मंदिरात सध्या उत्सव सुरू आहे. उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात ते सहभागी झाले होते. कीर्तन झाल्यानंतर ते दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून घराकडे जात असताना ही घटना घडली. जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर चिंचवड परिसरात शोककळा पसरली.
…दिवसांत दुसरी घटना
शनिवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर दुपारी नवले पुलाजवळ आणखी एक भीषण अपघात झाला. यात नियंत्रण सुटलेल्या ट्रेलर ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल खाटपे असे मृताचे नाव आहे. तो सिंहगड महाविद्यालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. मोपेड दुचाकीवरून जाताना ट्रेलरने त्याला धडक दिली. यात गाडीच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List