पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना साऊथ सुपरस्टारकडून आदिवासींचा अपमान; गुन्हा दाखल होताच मागितली माफी
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने ‘रेट्रो’ ऑडिओ लाँचदरम्यान आदिवासी समुदायाबद्दल केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देणारं निवेदन जारी केलं आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना विजयने आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. इतकंच नव्हे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात औपचारिक तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर अखेर विजयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याची बाजू मांडली आहे.
‘रेट्रो ऑडिओ लाँचदरम्यान मी केलेल्या एका टिप्पणीमुळे काही लोकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचं माझ्या लक्षात आलंय. मी प्रामाणिकपणे स्पष्ट करू इच्छितो की कोणत्याही समुदायाला, विशेषत: आपल्या अनुसूचित जमातींना, ज्यांचा मी मनापासून आदर करतो आणि आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो, त्यांना दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा माझी कोणताही हेतू नव्हता’, असं विजयने स्पष्ट केलंय.
याविषयी त्याने पुढे लिहिलं, ‘मी एकतेबद्दल बोलत होतो. भारत कसा एक आहे, आपले लोक एक आहेत आणि आपण एकत्र कसं पुढे जावं याबद्दल बोलत होतो. एक देश म्हणून एकजुटीने राहण्याचा आग्रह करताना मी भारतीयांच्या कोणत्याही गटाशी जाणूनबुजून का भेदभाव करेन. ज्यांना मी माझं कुटुंब मानतो, माझे बंधु मानतो. जमाती हा शब्द मी वापरला होता, तो ऐतिहासिक आणि शब्दकोशाच्या अर्थाने होता. शतकांपूर्वी जेव्हा मानवी समाज जागतिक स्तरावर जमाती आणि कुळांमधअये संघिट होता, बहुतेकदा संघर्षात होता. माझ्या बोलण्याचा संदर्भ अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाशी नव्हता, जो वसातहवादी आणि वसाहतोत्तर भारतात सुरू झाला आणि केवळ 20 व्या शतकाच्या मध्यात औपचारिक झाला. अगदी 100 वर्षांपूर्वीही नाही.’
या पोस्टच्या अखेरीस विजयने माफी मागितली. त्याने असंही लिहिलंय की तो नेहमीच लोकांच्या प्रगतीबद्दल आणि एकतेबद्दल विचार करतो. ‘जर माझ्या वक्तव्यातील कोणत्याही भागाचा गैरसमज झाला असेल किंवा त्यामुळे कोणी दुखावंल गेलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझं एकमेव उद्दिष्ट शांतता, प्रगती आणि एकतेबद्दल बोलणं होतं. मी माझ्या व्यासपीठाचा वापर प्रगती आणि एकतेसाठी करण्यास वचनबद्ध आहे, त्यात फूट पाडण्यासाठी नाही’, असं त्याने पोस्टच्या शेवटी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाला होता विजय?
संबंधित कार्यक्रमात काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना विजय म्हणाला, “काश्मीरमध्ये जे घडतंय त्यावर उपाय म्हणजे त्यांना (दहशतवाद्यांना) कठोर शिक्षा देणं आणि त्यांचं ब्रेनवॉश होऊ नये याची खात्री करणं. त्यांना यातून काय मिळणार आहे? काश्मीर भारताचं आहे आणि काश्मिरी आपले आहेत. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही, कारण पाकिस्तानी स्वत: त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत. जर हे असंच चालू राहिलं तर तेच त्यांच्यावर हल्ला करतील. ते 500 वर्षांपूर्वींच्या आदिवसींसारखे वागतायत ते अक्कल नसताना लढत होते.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List