व्हीआयपी व्यक्ती सामान्यांपेक्षा भारी आहेत का? डॉ. रघुनाथ कुचिक यांचा सवाल
शहरात व जवळजवळ सर्वच रस्त्यांवर अनेकदा खड्डे पडणं आणि त्याची दुर्दशा झालेली दिसून येते. मात्र, पुणेकर नागरिक व सामान्य लोकांना या खड्ड्यांतूनच चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच प्रवास करणे त्यांच्या नशिबी येते. रस्ते वाहतूक विभाग, महापालिका, राजमार्ग प्राधिकरण यासारख्या यंत्रणा याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केला आहे.
पुणे शहरामध्ये वाहतूक व्यवस्थापन करण्याऐवजी पोलीस तर ‘फक्त वाहनांवर कारवाई करणे,’ हेच एकमेव कर्तव्य असल्यासारखे वागताना दिसतात. मात्र, याच पुण्यात येत्या २२ तारखेला केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री येणार असल्याचे समजताच चक्क बावधन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना याची काळजी वाटू लागली आहे. त्यांनी तातडीने ‘त्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेत,’ अशी मागणी एका पत्राद्वारे महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. मात्र, हीच काळजी त्यांना व यंत्रणेला सामान्य नागरिकांबद्दल का वाटत नाही, असा प्रश्न डॉ. रघुनाथ कुचिक यांनी उपस्थित केला आहे.
सामान्य लोकांपेक्षा अति महत्त्वाच्या व्यक्तींना अधिक प्राधान्य हे सरकार देत असल्याचे यामधून दिसून येते. सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्था आणि दुटप्पी धोरणामुळे अनेक सामान्य नागरिकांना प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी शिवसेनेच्या वतीने सर्वच रस्त्यांची डागडुजी, देखभाल नियमितपणे करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List