येरवड्यातील हॉटेलमध्ये धांगडधिंगा सुरूच, हॉटेल मालकांवर गुन्हे
सातत्याने चर्चेत असणाऱ्या येरवड्यातील कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू राहत असल्याचे समोर आले आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत तब्बल 70 ते 80 नागरिक एकत्रित करून साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन हॉटेलच्या मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, मॅनेजर फैयाज फाकिरद्दिन मिर (32) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार प्रवीण खाटमोडे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.5) रात्री उशिरा कल्याणीनगर येथील हॉटेल कुकू याठिकाणी पोलिसांनी छापा कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये विनापरवाना रात्री साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे आढळून आले. तर, यावेळी हॉटेलमध्ये ४८ नागरिक उपस्थित होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित हॉटेल मालक, मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथीलच हॉटेल ‘ओ आय ब्रू’ येथे छापा कारवाई केली. त्यावेळी येथेही २५ ते ३० नागरिक आढळून आले. उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून त्यामध्ये अवैधरीत्या साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (30, रा. कोरेगाव पार्क), मॅनेजर निखिल बेडेकर (36, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर या भागात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने येथे कारवाई करून तब्बल 20 हून अधिक पबला टाळे ठोकले. मात्र, काही दिवसांतच या भागातील हॉटेल, पब संस्कृती पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कल्याणीनगर भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल आस्थापना सुरू राहत असल्याने येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List