काळम्मावाडी कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया
काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी कालवा पात्राच्च्या तळातून मोठे भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या घटनेने हजारो हेक्टर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बुधवारी मध्यरात्री पाण्याचा जोरदार प्रवाह पनोरी येथील बोगद्याजवळच्या कालव्याला भगदाड पडण्यास कारणीभूत ठरला. भगदाडाचा व्यास काही तासांतच १० फुटांपर्यंत वाढला. या भगदाडातून रात्रभर पाणी गळती होऊन परिसरातील शेती जलमय झाली. परिणामी शिवाराला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे हजारो हेक्टर बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दूधगंगा नदीत गढूळ आणि मातीमिश्रित पाणी आले आहे. ज्यामुळे नद्यांच्या पर्यावरणीय व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
वारंवार घडणाऱ्या घटना : व्यवस्थापनाचा अभाव
डाव्या आणि उजव्या कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असताना १०-१२ कि.मी. अंतरावर वारंवार अशा कालवा फुटीच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. या घटना कालव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच विभागाच्या व्यवस्थापनावर गंभीर शंका निर्माण करतात.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. पाटबंधारे खात्याने कालव्यांच्या डागडुजीसाठी आणि बांधकामाच्या मजबुतीकरणासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने कालव्यांच्या दुरुस्तीचे आणि मजबुतीकरणाचे काम हाती घेण्याची आवश्यकता आहे. कालवा फुटीच्या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही पाटबंधारे विभागावर तीव्र टीका होत आहे.
कालव्यांचे बांधकाम आणि देखभाल ही सरकारी जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी मांडली आहे.
दूधगंगा’ बनली ‘गढुळाचं पाणी
तालुक्यातील पनोरी येथे काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्यामुळे त्या पाण्याचा मोठा प्रवाह दूधगंगा नदीत मिसळल्याने नदीपात्र गढुळाचं पाणी बनले आहे. हे पाणी नागरिकांना पिण्यालायक नसल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दूधगंगा नदीकाठच्या गावांना पाणी उकळून अथवा क्लोरीनयुक्त पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पनोरी येथे काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे कालव्यातील पाण्याचा मोठा प्रवाह दूधगंगा नदीत मिसळला आहे. यामुळे पाणी चिखलयुक्त बनल्यामुळे नागरिकांना पाणी पिण्यालायक नसल्याचे दिसुन येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List