पुण्यात कोयता गँगची दहशत, दिवसाढवळ्य़ा भररस्त्यात तरुणाचा खून
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून, कोयता गँगची दहशत कायम आहे. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात कोल्हेवाडीत बुधवारी भरदुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांची पथके त्यांच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.
सतिश सुदाम थोपटे (38, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतिश थोपटे याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या विरोधात यापूर्वी हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सतिश हा सुशिला पार्कजवळील कोल्हेवाडी रस्त्यावर उभा असताना कोयताधारी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर वार केले. त्यात सतीश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात तो निपचित पडला.
स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कर्ज भरण्यासाठी पह्न केल्यामुळे खुनाची शक्यता
सतिश थोपटे याच्या नावावर आरोपी पैकी एकाने फ्लॅट घेण्यासाठी 25 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. तो कर्जाचे हप्ते भरत नसल्याने सतिश त्या व्यक्तीला वांरवार पह्न करत होता. त्यातून चिडून जाऊन सतिशच्या नावावर कर्ज काढणाऱया आरोपीने साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर कोयत्याने वार केले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हेवाडी, खडकवासला, किरकटवाडीसह परिसरात खळबळ उडाली. लोकवस्तीच्या ठिकाणी कोयत्याने हल्ला झाल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List