फोन येतात, पण मी कोणालाही होकार दिलेला नाही – हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुक्याच्या सर्व भागातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी आगामी दोन-चार दिवसांत चर्चा करणार आहे. सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन येत आहेत; परंतु कोणाला होकार दिलेला नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात परिवर्तन अटळ असून, विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पुढचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी भूमिका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली.
बावडा येथे त्यांच्या निवासस्थानी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील जनतेशी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी इंदापूर विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले. तसेच कार्यकर्त्यांनी तुतारीच्या घोषणा दिल्या.
ते म्हणाले, इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेत झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूर विधानसभेच्या जागेसंदर्भात जे बोलले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नव्हते. इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळणार असे सांगणारे अजित पवार हे सदरच्या सभेत महायुतीचा संकेत डावलून बोलले, त्यांना महायुतीमध्ये हा अधिकार कोणी दिला, अशी विचारणा मी अजित पवार यांनाही करणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना जायचे त्यांना थांबवू शकत नाही, असे केलेले वक्तव्य कोणता संदर्भ घेऊन केले हे समजत नाही, कारण मी अजून कोणतेही वक्तव्य केलेले नाही. याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी ‘राम कृष्ण हरी वाजवा तुतारी’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी अॅड. शरद जामदार, उदयसिंह पाटील, बाबा महाराज खरतोडे, डॉ. लक्ष्मण आसबे, पवनराजे घोगरे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अॅड. मनोहर चौधरी, अॅड. कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, माउली बनकर, सत्यशील पाटील, पिंटू काळे, पराग जाधव, अशोक इजगुडे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. रणजीत गिरमे यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List