मंगलदास बांदल ईडीच्या कस्टडीत; साडेपाच कोटींची रोकड, एक कोटीची घड्याळे जप्त
बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉण्डरिंग) आणि शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी त्यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी छापे टाकले होते. त्यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि साडेपाच कोटी रुपयांची रोकड आणि एक कोटीची चार घड्याळे जप्त केली.
ईडीच्या पथकाने बांदल यांच्या घराची झाडाझडती घेतली असता, पाच कोटी 60 लाखांची रोकड, एक कोटीची चार घड्याळे आढळली. जवळपास 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी बांदल यांना तपासासाठी मुंबईत नेले आहे. ईडी न्यायालयाने बादल यांना 29 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
विविध स्वरूपाचे गुन्हे
सराफ व्यावसायिकाला धमकाविल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी ‘मोक्का’नुसार कारवाई केली होती. पुणे जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणात बांदल जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणांत त्यांच्या नावावर गुन्हे आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पक्षाने पुन्हा त्यांची उमेदवारी रद्द केली होती. सध्या ते शिरूर मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List