कराड पालिकेतील दोन अधिकारी कार्यमुक्त, एकाची बदली; यशवंत आघाडीच्या आंदोलनाला यश
कराड नगरपालिकेच्या प्रशासकीय कालावधीमध्ये टाऊन प्लॅनिंग विभागाच्या अधिकाऱयांकडून नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्याबद्दल यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आक्रमक भूमिका घेत पालिकेसमोर आंदोलन उभारले. या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दोन अधिकाऱयांना कार्यमुक्त केले असून, एका वॉचमनची बांधकाम विभागाकडून अन्य ठिकाणी नियुक्ती केली आहे. तसेच दोन अधिकाऱयांच्या बदलीसंबंधीचे पत्र नगररचना सहायक संचालक यांना देण्यात आले आहे.
यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पाच अधिकारी-कर्मचाऱयांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र मुख्याधिकाऱयांना दिले होते. मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी या पत्राची दखल घेऊन 24 तासांत कारवाई केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱयांची गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा यशवंत आघाडीने दिला होता. यशवंत विकास आघाडीचे कार्यकर्ते नगरपालिका परिसरात दाखल होण्यापूर्वीच पाचही अधिकारी कार्यालयातून पसार झाले होते.
सहायक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे, रचना सहायक अधिकारी सचिन संभाजी पवार यांच्यावरील कारवाईसंबंधी मुख्याधिकाऱयांनी सहायक संचालकांकडे पत्र पाठविले आहे, तर रणजित मारुती वाडकर, नीलेश रवींद्र तडाके यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ‘प्रधानमंत्री शहरी आवास योजने’अंतर्गत तात्पुरत्या सेवेसाठी या दोन अधिकाऱयांची नियुक्ती केली होती. संतोष दिलीप शिंदे हे बांधकाम विभागात वॉचमन म्हणून कार्यरत होते. त्यांची वॉचमन म्हणून ‘यशवंतराव चव्हाण स्मृती सदन’ येथे बदली करण्यात आली आहे.‘कराड नगरपालिकेमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून, सामान्य लोकांची अडवणूक करून पैशांची मागणी होत असल्याविरोधात हे आंदोलन उभारले होते,’ अशी भूमिका राजेंद्रसिंह यादव यांनी जाहीर केली.
मी माध्यमांशी बोलणार नाही – मुख्याधिकारी
आंदोलनानंतर तातडीने अधिकाऱयांच्या बदल्या करण्याची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पत्रकारांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना प्रतिक्रिया विचारली असता, ‘मी माध्यमांशी बोलणार नाही,’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या मोजक्या प्रश्नांना त्यांनी मोजकीच उत्तरे दिली. याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List