करडवाडीतील अवैध दारूविक्री तातडीने बंद करा; रणरागिणींची पोलीस ठाण्यावर धडक
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करावी, या मागणीसाठी आज करडवाडी येथील रणरागिणींनी पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस अधिकाऱयांना निवेदन दिले. मात्र, ‘याबाबत उत्पादन शुल्क विभाग कारवाई करेल,’ असे उत्तर पोलीस प्रशासनाने दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या रणरागिणींनी कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
करडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दोनजण अवैधरीत्या दारूची विक्री करीत असल्याने गावातील अनेकजण दारूच्या आहारी जाऊन गावातील शांतता भंग पावली आहे. गावातील दारूविक्री बंद करावी, या मागणीसाठी आज करडवाडी येथील शारदा टापरे, लीला पालवे, शीला गर्जे, राणी गर्जे, प्रतिभा गर्जे, शारदा गर्जे, जनाबाई टापरे, मालन नाकाडे, नंदाबाई कराड, शोभा कराड, सिंधूबाई टापरे, नंदा घुले, सीमा गर्जे, पद्मा कराड, आदिनाथ गर्जे, संतोष जाधव, संतोष टापरे यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली.
गेल्या दहा वर्षांपासून दोन इसम गावात अवैधरीत्या दारूविक्री करतात. दारू विकणारे गुंड प्रवृत्तीचे असून, कोणाच्या आशीर्वादाने दारूविक्री सुरू आहे? असा सवाल करीत याबाबत आम्ही अनेक वेळा पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागालाही लेखी आणि तोंडी तक्रार केली आहे. याबाबत कोणतीही कारवाई होत नसून, गावात दारूविक्री सुरूच आहे. दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यास तुम्हाला कोणती अडचण येत आहे? गावातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याने कामधंदा करीत नाहीत. दारूमुळे कुटुंब मोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप रणरागिणींनी केला. दरम्यान, गावातील दारूविक्री बंद करावी, असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. या विषयावर तातडीने तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रणरागिणींनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List