बिबट्याचा पुन्हा मोटारसायकल स्वारावर हल्ला
पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिचगाई मळ्यात मोटारसायकलवर चाललेल्या संपत गेणभाऊ ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. ढोबळे यांनी मोटारसायकल रेस करून जोरात पळवल्याने सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बिबट्याची उडी मोटारसायकलच्या पाठीमागील मडगार्डवर आदळल्याने बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे मडगार्डवर पडले आहेत.
शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास संपत गेणभाऊ ढोबळे हे पारगाव काठापूर बुद्रूक रस्त्याने चिचगाई मळ्यात घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ढोबळे यांच्या गाडीवर उडी मारली. ढोबळे यांनी न घाबरता गाडी जोरात पळवली. त्यामुळे बिबट्याची उडी मोटारसायकलच्या पाठीमागील मडगार्डवर आदळल्याने बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे मडगार्डवर पडले आहेत. माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व गुलाब ढोबळे यांनी बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, वन विभागातर्फे दररोज वेगवेगळ्या विभागांत सायंकाळी चारचाकी वाहनाच्या साह्याने गस्त घालण्यात येत आहे. चारचाकी वाहनाच्या साह्याने गस्त घालून या गस्तीला बिबट्या घाबरणार आहे का? जनावरांवर व माणसांवर होणारे हल्ले हे होतच आहेत. मग या गस्तीचा नक्की फायदा काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List