अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द; 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी, बाल न्याय मंडळाचा आदेश
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांना चिरडणाऱया अल्पवयीन आरोपीचा जामीन अखेर जुवेनाईल कोर्टाने (बाल न्याय मंडळाने) रद्द केला आहे. त्याची रवानगी 14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, भयंकर अपघातानंतर अवघ्या 15 तासांत जामीन आरोपीला मिळाल्यामुळे पुणे पोलीस आणि बाल न्याय मंडळावर सर्वस्तरातून टीका झाली होती. त्यानंतर आज आरोपीचा जामीन रद्द केला.
कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्शे कार भरधाव वेगाने चालवून अल्पवयीन आरोपीने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणीला चिरडले. रविवारी पहाटे हा अपघात झाला. अल्पवयीन आरोपी हा बिल्डर विशाल अगरवालचा मुलगा आहे. त्याने पबमध्ये मद्यपान केले होते. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि बाल न्याय मंडळापुढे हजर केले होते. मात्र, आरोपी अल्पवयीन आहे. त्याचे वय 17 वर्ष 8 महिने असल्याने बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. वाहतूक नियमावर 300 शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांसोबत काम करावे, मद्यपान सोडून द्यावे अशा अटी शर्ती घालत बाल हक्क मंडळाने अवघ्या 12 ते 15 तासांत त्याचा जामीन मंजूर केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुणे पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असला तरी त्याचा गुन्हा गंभीर आहे. त्यामुळे जामीन रद्द करावा असा पुर्नविचार अर्ज बाल न्याय मंडळाकडे दाखल केला होता.
खटला चालवायचा की नाही हे दोन ते तीन महिन्यांनी ठरणार
अल्पवयीन आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. बाल सुधारगृहात असताना पोलीस त्याची चौकशी करू शकतील अशी तरतूद कायद्यात नाही. तसेच या मुलावर तो सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे पोलीस तपासावर ठरेल. तसेच मुलाच्या मानसिक, शारीरिक स्थितीविषयीचे अहवाल लक्षात घेतले जातात. दोन ते तीन महिन्यात जेव्हा पोलिसांचा तपास पूर्ण होईल तेव्हा ते न्यायालयासमोर बाजू मांडतील त्यानंतर या आरोपी मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे न्यायालय ठरवेल, असे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले.
पोलीस प्रशासन जागे व्हा; पब संस्कृती बंद करा
बंद करा, बंद करा पब संस्कृती बंद करा. जागे व्हा, जागे व्हा पोलीस प्रशासन जागे व्हा, अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला. शहरातील पब संस्कृती बंद व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेकडून येरवडा चौक ते पोलिस स्टेशन असा ‘मशाल मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आंदोलनाला शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक संजय भोसले, उपशहरप्रमुख आनंद गोयल, सागर माळकर आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List