कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या नगरोत्थान रस्तेकामात त्रुटी, अतिरिक्त आयुक्तांसह शहर, जल अभियंत्यांना नोटीस
कोल्हापूर शहरात नगरोत्थानातून सध्या सुरू असलेल्या 100 कोटी निधीच्या रस्तेकामाबाबत नागरिकांकडून शंका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. नवीन रस्ता 24 तास होण्यापूर्वी खोदल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासक तथा महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्वतः आज कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागात समन्वय नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली.
‘महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान’अंतर्गत 100 कोटींच्या निधीतून शहरात 16 मुख्य रस्ते करण्यात येत आहेत. सोलापूर येथील ठेकेदाराला याची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मंजूर 16पैकी पाच रस्त्यांची कामे ठेकेदारामार्फत सुरू आहेत. यात कोळेकर तिकटी ते नंगिवली चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड, खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक, माउली चौक ते हुतात्मा चौक येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची व इतर कामाची प्रशासकांनी आज पाहणी केली. यावेळी येथे ड्रेनेजचे मेनहोल, युटिलिटी व इतर बाबी डांबरीकरण करताना समन्वयाअभावी डांबरीकरणाच्या खाली गेल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरिकांशी प्रशासकांनी संवाद साधून सूचना व तक्रारी जाणून घेतल्या. यानंतर अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व ठेकेदार यांना सर्व कामे दर्जेदार आणि दिलेल्या मुदतीत व टेंडरमधील नियमानुसार पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्यावर अथवा गटारीमध्ये पाणी तुंबून कोणाच्याही घरात जाऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर. के. पाटील, महादेव फुलारी अधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List